
दोडामार्ग : महिलेला ठोकर देऊन पळून गेलेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्याबाबत होत असलेल्या दिरंगाई विरोधात कळणे येथील महिलेच्या कुटुंबाने स्वातंत्रदिनी उपोषणाचा इशारा दिला आहे. कळणे येथील हेमलता मनोहर देसाई व वैशाली विश्वास देसाई या 12 जुलै (70) रोजी संध्याकाळी वाफोली - बांदा रस्त्यावरून चालत येत होत्या. त्याचवेळी भरधाव वेगाने येऊन दुचाकीस्वराने त्यांना धडक देऊन गोव्याच्या दिशेने पळून गेला.
या अपघातात हेमलता देसाई जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने गोव्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया केल्यानंतर देखील वीस दिवसाहून अधिक काळ त्या बेशुद्ध अवस्थेत राहिल्या. दरम्यान, या अपघाताच्या तपासाबाबत पोलिसांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहें. गेल्या महिनाभरात वारंवार विचारणा करुन देखील बांदा पोलिसांनी तपासाला गती दिलेली नाहीं. दुचाकीस्वार गोव्याच्या दिशेने पळाला याची माहिती व सीसीटीव्ही फुटेज असताना देखील पोलिसांनी त्याबाबत अधिक तपास करण्यास टाळाटाळ केली.
आमचे कुटुंब अडचणीत असताना देखील पोलिसांनी साधी चौकशी केली नाही, असा आरोप जखमींचा मुलगा तथा कळणे सरपंच अजित देसाई यांनी केला. त्यामुळेच अखेर जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकारी यांना श्री. देसाई यांनी निवेदन दिले. तपासबाबतची दिरंगाई व पोलिसांची नकारात्मक भूमिका यांच्या विरोधात स्वातंत्रदिनी ओरोस येथे कुटुंबाला घेऊन उपोषण करण्याचा इशारा दिला आहें.