माजगाव सातेरी मंदीरात नवरात्रोत्सवाचा उत्साह..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 16, 2023 13:22 PM
views 73  views

सावंतवाडी : माजगाव येथील श्री देवी सातेरी मंदीरात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी गावातील मानकरी व पुरोहित सचिन माजगावकर यांनी देवीची पूजा अभिषेक करून सर्वांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. पहिला दिवस म्हालटकरवाड्याचा असल्याने देवीची हळदकुंकू साडी खणा नारळाची ओटी भरून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आनंद सावंत व पदाधिकारी तसेच गावातील मानकरी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे दिप प्रज्वलित करून उदघाटन केले.

जयशंभो मंडळाच्यावतीने मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. चंद्रकांत सावंत गुरूजी यांनी नवरात्रोत्सवातील माहीती दिली. कार्यक्रमाची सुरुवात सौभाग्यवतीनी स्वागतगीतानी केली. बच्चे कंपनीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दांडिया गोंधळ कार्यक्रमास प्रेक्षकांनी ठेका धरला. रामायणातील सिता स्वयंवर देखावा लक्षवेधी ठरला देखाव्यातील कलाकारांनी आपापली भूमिका त्या कलेला अनुरूप होवून केली. रावणाच्या भूमिकेत प्रथमेश सावंत यांनी सर्वांना हसवून टाकले. शेवटपर्यत उपस्थितीत चांगली होती रात्री भजन व आरती केली.सातेरी मंदीरात नवरात्रोत्सवात प्रत्येक वाड्याचे सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता सुरू होणार असून कार्यक्रमास सर्वानी उपस्थितीत रहावे असे आवाहन केले.