सावर्डे विद्यालयात ‘हर घर तिरंगा’चा उत्साह

ऑनलाईन क्विझ व ‘सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रमात ११४७ विद्यार्थी सहभागी
Edited by: मनोज पवार
Published on: August 16, 2025 15:19 PM
views 35  views

सावर्डे : देशभक्तीची भावना जोपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची जाणीव निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे या अभियानाचे उत्साहपूर्ण आयोजन झाले.

अभियानाच्या पहिल्या टप्प्यात रांगोळी स्पर्धा, भिंती सजावट स्पर्धा, प्रभात फेरी आणि सायकल रॅली यांसारखे उपक्रम घेण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात ध्वजारोहण सोहळा, तसेच डिजिटल माध्यमातून ‘हर घर तिरंगा’ ऑनलाईन क्विझ व ‘सेल्फी विथ तिरंगा’ हे विशेष उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी घराघरातून तिरंगा फडकवून, तसेच तिरंग्यासोबत सेल्फी काढून समाजमाध्यमांवर शेअर करून देशभक्तीचा संदेश पसरविला.

या उपक्रमात विद्यालयातील एकूण ११४७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, पालकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन मुलांच्या देशभक्तीची भावना दृढ करण्यास हातभार लावला.

संपूर्ण अभियानाचे मार्गदर्शन प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी केले, तर सहाय्यक शिक्षक मंगेश दाते व योगेश नाचणकर यांनी समन्वय साधून सर्व उपक्रम यशस्वीपणे राबविले.

या निमित्ताने विद्यालयात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या मनात भारताच्या तिरंग्याबद्दल अभिमान आणि आदर अधिक दृढ करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.