भेडशीच्या पंधरा दिवसांच्या शिमगोत्सवाची सांगता..!

Edited by:
Published on: April 07, 2024 14:10 PM
views 192  views

दोडामार्ग : भेडशी गावच्या पंधरा दिवसाच्या शिमगोत्सवाची रविवारी मोठ्या उत्साहात रंगाची उधळण करत धुळवडीने सांगता झाली. दोडामार्ग तालुक्यात भेडशी सह घोटगेवाडी येथे सालाबादप्रमाणे दरवर्षी पंधरा दिवसाचा शिमगोत्सव साजरा केला जातो. विविध कार्यक्रम आणि पंधराव्या दिवशी गावातील सर्व लोक मोठ्या उत्साहात रंगाची उधळण करीत शिमगोत्सवातील आनंद लुटतात.

भेडशी येथील दामोदर देवस्थानचा पंधरा दिवसांचा शिमगोत्सव अशाच पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा होतो. याची सुरुवात होळीपासून सुरू होऊन अकराव्या दिवसापासून मांड धरला जातो. पुढील पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यात गावातील ग्रामस्थ सहभागी होऊन नाटकही सादर करतात.

होळीच्या पंधराव्या दिवशी सकाळी मांड धरला जातो त्यानंतर चोर खेळ, गाऱ्हाणी बोलणी, नवस फेड आदी धार्मिक कार्यक्रम केले जातात. त्यानंतर गावातील लहान थोर मंडळी ,महिला वर्ग रंगांची उधळण करतात आणि शिमगोत्सवाचा आनंद लुटतात. श्री देव दामोदर आणि अठ्ठेचाळीस देव देवतांचरणी प्रार्थना करून नवस बोलणी केली जाते.  यासाठी माहेरवाशीण मुली, नातेवाईक ,परिसरातील भक्तगण ही मोठ्या संख्येने भेडशी शिमगोत्सच्या रोमाट कार्यक्रमाला उपस्थिती लावतात. धुळवड व न्हावन कार्यक्रमाने शिमगोत्सची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. रविवारी या निमित्ताने भेडशी वासियांनी बाजारपेठही बंद ठेवली होती.