
दोडामार्ग : पाळये व तेरवण-मेढे येथे हत्तींनी कळपा उच्छाद मांडला आहे. पाळये येथील शेतकरी गणेश शिरसाट यांचा तब्बल वीस फुटी माड जमीन दोस्त केला. तर तेरवण-मेढे येथे काजूची झाडे व माड यांचे नुकसान केले. तसेच पाळये येथे घरालगत येत फणसावर ताव मारला. हत्ती घराजवळ आल्याने घरातील मंडळी अत्यंत भयभीत झाली. घरालगत हत्तींचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण पसरले आहे.
पाळये परिसरात सध्या टस्कर व एका पिल्लाचा वावर आहे. हे हत्ती येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करत आहेत. शिवाय घरालगतही येत आहेत. येथील शेतकरी गणेश शिरसाट यांच्या फळबागायतीत हे दोन्ही हत्ती घुसले. तेथील मोठा माड त्यांनी मुळासकट उखडून टाकला. तसेच घराच्या पाठिमागे असलेल्या फणसाच्या झाडाजवळ आले. फणसावर ताव मारून इतर फणसांची नासधूस केली. हत्ती घराजवळ आल्याची माहिती घरातील मंडळींना व ग्रामस्थांना समजताच सर्वजण एकवटले व हत्तींना तेथून विटाळून लावले. हत्तींनी मागील वीस वर्षांपासून आपल्या शेतीचे, फळबागायतींचे अतोनात नुकसान केल्याचे गणेश शिरसाट यांनी सांगितले. तेरवण-मेढे येथे देखील हत्तींनी फळबागायतींचे नुकसान केले. काजूची झाडे, माड उध्वस्त केले. बुधवारच्या एकाच रात्रीत हत्तींनी दोन गावांत नुकसानसत्र केल्याने शेतकरी कमालीचा चिंतातुर झाला आहे. वनविभागाने या हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांतून केली जात आहे.