जिल्हाधिकाऱ्यांनी धरला ताल ; 'चिमणी पाखरं'सोबत नृत्याविष्कार

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 24, 2026 15:14 PM
views 134  views

कुडाळ : कुडाळमध्ये सध्या सुरू असलेल्या 'सिंधू सरस' प्रदर्शनाची रंगत काल एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने द्विगुणित झाली. जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केवळ उपस्थितीच दर्शवली नाही, तर चक्क व्यासपीठावर येऊन नृत्याचा आनंद लुटला. 'चिमणी पाखरं डान्स अकॅडमी'च्या चिमुकल्या कलाकारांसोबत त्यांनी केलेल्या नृत्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

सिंधू सरस प्रदर्शन आणि विक्री महोत्सवात काल स्थानिक कलाकारांच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 'चिमणी पाखरं डान्स अकॅडमी'च्या मुलांचा नृत्य आविष्कार रंगणार होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनाही नृत्याचा मोह आवरला नाही. त्यांनी 'अवतरली तारका' या लोकप्रिय गीतावर अकॅडमीच्या मुलांसोबत ताल धरला.


जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या केवळ एक सक्षम प्रशासकच नाहीत, तर त्या भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारातही पारंगत आहेत. त्यांच्या नृत्यातील लयबद्धता आणि उत्साह पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. याआधीही त्यांच्यातील कलाकार विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून समोर आला आहे.

या नृत्याविष्कारामुळे 'सिंधू सरस'च्या वातावरणात एक वेगळीच चैतन्य निर्माण झाले असून, सोशल मीडियावरही त्यांच्या या डान्सचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.