
वेंगुर्ले : सन २०२३- २४ चा जिल्हास्तरीय शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव ऊनाचे कारण देत रद्द केल्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे होत असलेल्या नुकसानाबाबत वेंगुर्ले तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीच्या आजी माजी अध्यक्षांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देत या विषयाकडे लक्ष वेधले. यावेळी या स्पर्धा इनडोअर घेण्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिल्याची माहिती निवेदनकर्त्यांनी दिली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, शिक्षणाधिकाऱ्यांनी हा असंवेदनशील निर्णय घेऊन एका पिढीचे नुकसान कधीही भरून येणार नाही. ऊन लागते हे कारण चुकीचे आहे. पर्यायी व्यवस्था तंबू ठोकून करता येते. कालावधी वाढवून चार दिवस स्पर्धा घेऊन सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ३ ते ६ स्पर्धा घेणे शक्य होते. मुलांना जिल्ह्यात तीन सामने खेळायचे असतात. पाच-पाच मिनिटांचे सहा डाव होऊ शकतात. राष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये समस्या आल्यास वेळ कमी करून सामने खेळवले जातात. स्पर्धा रद्द करणे हा विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळणारा निर्णय आहे. ज्या विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रकारात शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी अपार कष्ट घेतले आहेत त्यांचे काय? संपूर्ण क्रीडा स्पर्धाचे नियोजन डिसेंबर मध्ये करायचे होते तरी एवढा विलंब का लागला? असाही सवाल निवेदनात केला आहे.
मैदानां व्यतिरिक्त स्पर्धा सहज घेता आल्या असत्या पण स्पर्धा पुढे ढकलून उन्हाचे कारण देत निष्काळजीपणे रद्द केल्या. आधीच सतराशे साठ कारणे सांगून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यात उन्हाची भर. कर्मचारी क्रीडा स्पर्धाचे नियोजन नसतानाही जिल्ह्यापर्यंतच्या स्पर्धा संपन्न झाल्या. त्या एवढ्या झटपट का घेतल्या त्या जागी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेऊ शकला असता, विद्यार्थ्यांची उनाचे कारण देऊन स्पर्धा रद्द करता. हीच काळजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दाखवली जात नाही. दाखवली असती तर अनेक पिढ्यांचे नुकसान टळले असते. हे नुकसान आजतागायात चालू आहे.
गुणवंत शिक्षक शाळेत आला की प्रगती नाहीतर नुसती फक्त शिकवण्याची औपचारीक्ता हे थांबणार कधी, साडेपाच वर्ष वयाची मुले अध्यादेशाचे कारण सांगून दाखल करून मुख्याध्यापक घेतात. आज ती मुले अप्रगत राहिली आहेत, याला जबाबदार कोण? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेत शिक्षण परिषद घेतली जाते. अध्यापनाचा वेळ कमी दिला जातो. शिक्षण परिषदेचा उपयोग फारसा दिसतच नाही. शिक्षण परिषदेची औपचारिकता करायचीच असेल तर ती शनिवारी सकाळी १! वाजता शाळा सुटल्यानंतर करावी आणि आपण विद्यार्थ्यांसाठी संवेदनशीलता दाखवावी. तरि महोदय प्राथमिक शिक्षणातल्या समस्या भरपूर आहेत. याची गांभीर्याने दखल घेणे नितांत गरज आहे. कित्येक पिढ्यांचे नुकसान वर्षानुवर्ष होत आहे. हे नुकसान फक्त विद्यार्थ्यांचे होत आहे ना शिक्षकांचे ना शिक्षण विभागाचे. असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान हे निवेदन आजी, माजी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष शिष्टमंडळ समीर सावंत, सुशांत नाईक, सुनिल नाईक, संदीप परब, उमेश पावणोजी, राजन परब यांनी मंत्री दीपक केसरकर यांना देऊन लक्ष वेधले.