सिंधुदुर्गात ८ सखी - ८ आदर्श मतदान केंद्रांची उभारणी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 06, 2026 19:56 PM
views 8  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असून, मतदान प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित व लोकाभिमुख व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात आठ ठिकाणी सखी मतदान केंद्र तर आठ ठिकाणी आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सखी मतदान केंद्राला भेट देत तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महिला मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेत, मतदान दिवशी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या.

सखी मतदान केंद्रांची ठिकाणे

जिल्ह्यात महिला मतदारांना सुलभ व सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी आठ सखी मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. वैभववाडी तालुक्यात नाधवडे चारवाडी, कणकवली तालुक्यात कलमठ, देवगड तालुक्यात कट्टा-जामसंडे, मालवण तालुक्यात मिर्ये-बांदा, कुडाळ तालुक्यात पावशी गावठाणवाडी, वेंगुर्ला तालुक्यात मठ, सावंतवाडी तालुक्यात माडखोल-धवडकी तसेच दोडामार्ग तालुक्यात झरे क्रमांक १ येथे सखी मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.

आदर्श मतदान केंद्रांची ठिकाणे

मतदारांना उत्तम सुविधा व शिस्तबद्ध व्यवस्था अनुभवता यावी, यासाठी जिल्ह्यात आठ आदर्श मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. वैभववाडी तालुक्यात जिल्हा परिषद केंद्र शाळा क्रमांक १, खांबळे, कणकवलीत वागदे, देवगडमध्ये तळेबाजार, मालवणमध्ये गोळवण, कुडाळमध्ये पिंगळी, वेंगुर्ल्यात आडेली, सावंतवाडीत माजगाव आणि दोडामार्ग तालुक्यात उसाप येथे आदर्श मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.