कणकवलीत 83 हजार 585 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

जि .प. साठी 13 तर पं.स.साठी 25 उमेदवार रिंगणात
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 06, 2026 20:03 PM
views 10  views

 कणकवली : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या  निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. कणकवली तालुक्यांत 83 हजार 585 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा परिषदेच्या दोन जागा तर पंचायत समितीच्या सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळेजिल्हा परिषदेच्या उर्वरित 6 जागांसाठी 13 उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या 10 जागांसाठी 25 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

7 फेब्रुवारीला सकाळी 7.30 ते 5.30 यावेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जानवली जिल्हा परिषद व त्यातील दोन्ही पंचायत समिती बिनविरोध झालेल्या आहेत. याव्यतिरिक्त सातही जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तालुक्यांत 83 हजार 585मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  मतदान प्रक्रियेसाठी निवडणूत अधिकारी व कर्मचारी मतदानाचे साहित्य घेऊन रवाना झाले आहेत .

कणकवली तहसिल कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी जगदिश कातकर , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वाटप सकाळी 10 वाजल्यापासून सुरु करण्यात आले. 800 कर्मचारी व अधिकारी या प्रक्रियेसाठी आहेत. मतदान साहित्य व कर्मचा-यांच्या वाहतूकीसाठी 14 एसटी बसेस व 14 जीप गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती यांसाठी एकूण 118 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे, यासाठी एकूण 118 ईव्हीएम मशीन व 28 राखीव मशीन आहेत. 

प्रत्येक केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी,  पोलीस कर्मचारी व शिपाई असे मिळून 800 कर्मचारी व अधिकारी तैनात असणार आहेत. त्यामध्ये 14 झोनल अधिकारी व 4 राखीव झोनल अधिकारी काम पाहणार आहेत. त्यामुळे कणकवली तालुक्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे.

अशा होणार लढती

जिल्हापरिषद मतदार संघ - 

१.हरकुळ बुद्रुक-मनोज रावराणे (भाजप), प्रमोद सांगवेकर (अपक्ष). २. कलमठ-सुप्रिया मेस्त्री (भाजप), वैदेही गुडेकर (उद्धवसेना). ३.कळसुली-शीतल दळवी (भाजप), प्राची आमडोसकर ( उद्धवसेना). ४.नाटळ-संदेश उर्फ गोट्या सावंत (भाजप), उत्तम लोके (उद्धवसेना).  ५.कासार्डे-संतोष पारकर (भाजप), हनुमंत म्हसकर (उध्दवसेना).६.फोंडाघाट-सदानंद उर्फ बबन हळदिवे (शिंदेसेना),अनंत पिळणकर (राष्ट्रवादी शरद पवार गट), राजन चिके (अपक्ष). ७.जानवली-रुहिता तांबे (शिंदेसेना) बिनविरोध. ८.खारेपाटण- प्राची ईस्वलकर (भाजप)बिनविरोध.

पंचायत समिती मतदारसंघ 

१.खारेपाटण-गुरुप्रसाद शिंदे (शिंदेसेना), रामचंद्र राऊत (उध्दवसेना),  रफीक नाईक (अपक्ष). २.तळेरे-राजेश जाधव (भाजप),प्रवीण वरुणकर (कॉंग्रेस). ३.कासार्डे- सहदेव उर्फ अण्णा खाडये (भाजप),मयुर पेडणेकर (उद्धवसेना). ४.फोंडाघाट-पवन भालेकर (भाजप),चैतन्य सावंत(उध्दवसेना), साईनाथ भोवड(अपक्ष),राजेश शिरोडकर(अपक्ष), सुभाष सावंत (अपक्ष).  ५.लोरे-मानसी मराठे (भाजप), कीर्ती एकावडे (उद्धवसेना). ६.हरकुळ खुर्द-चंद्रहास उर्फ बबलू सावंत (भाजप), अविनाश सावंत (उद्धवसेना),विद्याधर तांबे (अपक्ष). ७.कलमठ - गुरुनाथ वर्देकर (भाजप), विनायक उर्फ बाळू मेस्त्री(अपक्ष). ८.कळसुली-लक्ष्मण गावडे (भाजप)-मनोहर मालंडकर (उद्धवसेना), भालचंद्र दळवी (अपक्ष). ९.ओसरगाव-अक्षता राणे (शिंदेसेना), चंदना राणे (उद्धवसेना). १०.नरडवे-राजश्री पवार ( भाजप), पूजा गावकर (उध्दवसेना). ११.हरकुळ बुद्रुक 

बिनविरोध दिव्या पेडणेकर (भाजप). १२.नांदगाव -बिनविरोध हर्षदा वाळके (भाजप). १३.वरवडे- बिनविरोध राजेश उर्फ सोनू सावंत (भाजप). १४.जानवली बिनविरोध- महेश्वरी चव्हाण (भाजप). १५.नाटळ- बिनविरोध - सायली कृपाळ (भाजप), १६.बीडवाडी बिनविरोध -  संजना राणे (भाजप). अशा लढती होणार आहेत.