...तर जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला टाळे ठोकणार

वैभव नाईक - सतीश सावंत यांचा इशारा
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 26, 2023 14:50 PM
views 59  views

सिंधुदुर्ग : आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा ५३ कोटी रु. हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची सुमारे  १२० कोटी रु रक्कम प्रलंबीत आहे.ही रक्कम गणपती पूर्वी मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने  आंदोलन केले होते.त्याचबरोबर  सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी देखील रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.राज्याच्या कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर गणपती पूर्वी विमा रक्कम देण्याची ग्वाही त्यांनी दिली होती.मात्र आता फळ पिकांचा नवीन हंगाम सुरू व्हायला आला तरी देखील विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. औषध फवारणीसाठी, झाडांची देखभाल करण्यासाठी लागणारे पैसे आता शेतकऱ्यांकडे नाहीत. आंदोलने करून निवेदने देऊन देखील सरकार याकडे लक्ष देत नसल्याने १ नोव्हेंबर २०२३ रोजी पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडून सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आहे. 

           आंबा व काजू पिक विमा योजनेत केद्र  व राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचे ५३ कोटी रुपये अद्याप भरले नाहीत. या योजनेत शेतकऱ्यांनी आपल्या हप्त्यापोटी  ११ कोटी रु भरले आहेत.   सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू पिकांसाठी सन २०२२-२३ मध्ये ३८४६७ शेतकरी सहभागी झाले आहेत. १ डिसेंबरपासून २०२२ पासून  विमा संरक्षणाचा कालावधी सुरू झाला. हा कालावधी १५ मे २०२३  पर्यंत होता. शासन निर्णयानुसार पिक विम्याचा कालावधी संपल्याच्या  ४५ दिवसानंतर अर्थात १ जुलैच्या दरम्याने पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देणे क्रमप्राप्त होते. मात्र अद्याप हि रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही.