
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जि. प. प्राथमिक शिक्षकांना निवडणूक कामी बी.एल.ओ.म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.प्राथमिक शिक्षकांना बी.एल. ओ . काम देण्यात येऊ नये, म्हणून संघटनेने वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाचा पी.एल.आय. संदर्भाने असा निर्णयही झालेला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या प्राथमिक शिक्षकांची १७% रिक्त पदे आहेत. तरीही अनेक शिक्षकांना बी.एल.ओ. चे काम दिले गेले आहे. सद्यस्थितीस बी.एल.ओ.चे काम पाहता त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वारंवार ऍपवर माहिती भरणे तसेच अन्य कामे बी.एल.ओ.म्हणून करावी लागतात.अशा परिस्थितीत सध्या ४ जुलै पर्यंत मतदारांची गृहभेट घेऊन व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहेत.
तथापि पावसाळ्याच्या दिवसात संपूर्ण दिवस शाळा सांभाळून 100 % मतदारांचे गृहभेटीद्वारे व्हेरिफिकेशन करणे अशक्य आहे. तसेच शाळा सुरू होऊन काही दिवसच झाले असल्याने अध्ययन अध्यापनात बाधा येणार आहे. त्यामुळे बी.एल.ओ. कामी असलेल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची कार्यमुक्ती करून या जबाबदारीतून मुक्तता करावी,अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.