कणकवलीत जनशताब्दीच्या धडकेत अज्ञात तरुणाचा मृत्यू..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 23, 2024 14:32 PM
views 636  views

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर कणकवली नागवेच्या दिशेने जाणाऱ्या गोठणीच्या आंब्याच्या झाडाजवळील रेल्वे ट्रॅकवर जनशताब्दी एक्सप्रेसच्या धडकेत अज्ञात तरुणाचा मृत्यू झाला. सायंकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. गळ्यात काळा दोरा बांधलेला आहे. त्याच्या अंगावर  फुल पँट, पिवळसर रंगाचे फुल शर्ट, रंग काळा सावळा आहे. वय साधारण 40 ते 45 असून त्याच्याजवळ रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट देखील आढळले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मडगाव ते मुंबई जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस खाली नागवे गाव हद्दीत ४० ते ४५ वर्षाच्या तरुणाचा अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.  घटनास्थळी त्या तरुणांच्या मृतदेहाचे अनेक तुकडे विखुरले गेले होते. जनशताब्दी एक्सप्रेसच्या चालकाने याबाबतची माहिती नांदगाव रेल्वे स्टेशन मास्तर यांना दिली. तर नांदगाव रेल्वे स्टेशन मास्तर यांनी कणकवली स्टेशन मास्तर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. दरम्यान, सायंकाळी कणकवली पोलीस नागवे रेल्वे ट्रॅक येथे जाऊन घटनेची माहिती घेत आहेत. दरम्यान सायंकाळपर्यंत रेल्वे धडकेत मृत झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही.