
सिंधुदुर्ग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नव्याने मंजुरी मिळालेली आहे. येथील आवश्यक पदे अद्याप भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शासनाने सर्व पदे भरल्यानंतर हे महाविद्यालय सक्षमपणे सुरू होईल. त्यावेळीच आपल्याला अपेक्षित असलेली आरोग्यसेवा मिळणार आहे. असे सांगत वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन सुनीता रामानंद यांनी राष्ट्रवादीच्या शिस्ट मंडळाशी बोलताना सर्व अपयशाचे खापर शासनावर फोडले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील गैरकारभार, अस्वच्छता, रुग्णांना मिळत नसलेल्या सेवा, रुग्ण रेफर करण्याचे प्रमाण आदी विविध मुद्यांवर आज राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ सुनीता रामानंद यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी भास्कर परब, बाळ कण्याळकर, प्रतीक सावंत आदि उपस्थित होते.
यावेळी अमित सामंत यांनी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गैरकारभाराचा पाढाच वाचला. येथील अस्वच्छता, रुग्णांना चांगली सेवा मिळत नाही. शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. डॉक्टर उपलब्ध होत नाहीत आदी मुद्यांकडे अधिष्ठाता यांचे लक्ष वेधले. तसेच या ठिकाणी चांगली आरोग्य सेवा मिळत नसेल तर हे रुग्णालय बंद केलेलेच चागले असेही अमित सामंत यांनी चर्चेत अधिष्ठाता यांना सांगितले. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी रात्री अपरात्री बाहेर फिरत असतात त्यावर अंकुश ठेवावा अशी सूचना केली. दरम्यान आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे. त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्यात यश येत नाही. त्यामुळे रुग्णाला रुग्ण सेवा देताना अडचण येत आहे. तसेच रुग्णाला चांगली आरोग्य सेवा मिळावी आणि त्याला उपचार मिळावेत त्यांचे प्राण वाचावेत यासाठी आम्हाला रुग्ण रेफर करावे लागत आहेत. हे वैद्यकीय महाविद्यालय नव्याने मंजूर झाले आहे अद्याप येथे आवश्यक सुविधा शासनाने पुरविलेल्या नाहीत आवश्यक डॉक्टरांची पदे भरलेली नाहीत येथे मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची रिक्त पदे आहेत याबाबत वेळोवेळी शासनाला अहवाल दिला आहे येथे प्रसूतीतज्ञ भूलतज्ञ बालरोगतज्ञ या सर्व विविध महत्त्वाची पदे रिक्त असल्याने सेवा देताना अडचणी निर्माण होत आहेत मंजूर पदापैकी केवळ पंधरा टक्केच पदे भरलेले आहेत त्यामुळे अपेक्षित सेवा पुरवणे शक्य नाही ही सर्व पदे भरल्यानंतर हे महाविद्यालय सक्षमपणे सुरू होईल त्यावेळीच आपल्याला अपेक्षित असलेले आरोग्यसेवा मिळणार आहे असे सांगत डॉ. सुनिता रामानंद यांनी सर्व अपयशाचे खापर शासनावर फोडले. तर रुग्णालयातील स्वच्छतेबाबत आपण येत्या आठ दिवसात कंत्राटी सफाई कामगार भरून यापुढे स्वच्छता राखली जाईल असे सांगितले.
शिक्षण व्यवस्था सक्षम नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टर यायला का तयार होत नाही असा प्रश्न राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला असता जिल्ह्यात शिक्षण व्यवस्था सक्षम नाही आवश्यक सोयी सुविधा मिळत नसल्याने या ठिकाणी डॉक्टर राहायला तयार होत नाही त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मोठा आहे असे सांगत डीन डॉक्टर सुनिता रामानंद यांनी जिल्ह्याच्या शिक्षण व्यवस्थेची मर्यादा उघड केली.
यानंतर अमित सामंत हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे आपल्या शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे लक्ष दिला असता तर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील मोठा प्रश्न मार्गी लागला असता. मात्र त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पूर्णतः दुर्लक्ष केला आहे. त्यांना कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र याशिवाय काही दिसत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा खालावण्यास मंत्री हसन मुश्रीफ जबाबदार असल्याचा आरोप आज राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.