४ तास लटकला खांबावर मृतदेह...!

महावितरणकडून मृतदेहाची २० हजार किंमत ; ग्रामस्थ आक्रमक
Edited by: विनायक गावस
Published on: October 16, 2023 13:03 PM
views 450  views

सावंतवाडी : आरोस नाबारवाडीमध्ये खांबावर चढून सेवा बजावत असताना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने एका वायरमनचा जागीच मृत्यू झाला. अमोल भरत कलंगुटकर असे मयत वायरमनचे नाव आहे. घटनेनंतर दोन ते तीन तासांनी घटनास्थळी हजर झालेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी किंवा ठेकेदार येत नाही तोपर्यंत मृतदेह खाली उतरवू देणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. अन्यथा उपअभियंता डी वाय चव्हाण व ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असा आक्रमक पवित्रा घेतला. उशिरा पर्यंत मृतदेह त्याच स्थितीत होता.

गावात वीज समस्या निर्माण झाल्याने कंत्राटी वायरमन अमोल भरत कलंगुटकर (वय 23, कलंगुटकरवाडी - आरोस ) पुरवठा बंद करुन आरोस नाबरवाडी येथील खांबावर चढलेले असता त्याचवेळी अचानक विद्युत पुरवठा सुरू झाला अन वायरमन खांब्यावर लटकला. जवळजवळ तीन तासांनी उप कार्यकारी अभियंता डी. वाय. चव्हाण कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. नुकसानी पोटी केवळ 20 हजार रुपये देणार असल्याचे सांगताच ग्रामस्थ आक्रमक झाले. हप्तेखोर अधिकारी पोसण्याचे काम वीज वितरण करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच ठेकेदार आपली जबाबदारी टाळून गायब झाला अन तुम्ही त्याची बाजू घेता याचा अर्थ काय, हा हकनाक बळी असून याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला.

अमोल भरत कलंगुटकर चार महिन्यांपूर्वी सेवेत रुजू झालेला. घरचा कर्ता पुरुष गेल्याने त्याचा परिवारावर संकट कोसळले आहे. रात्री उशीरा पर्यंत मृतदेह खांबावर लटकत होता. दरम्यान, जबाबदारी ठेकेदार व वीज वितरणची असून मयताच्या कुटुंबातील सदस्यला पंधरा हजार रुपये पेन्शन व इतर लाभ देणार असल्याचे डी वाय चव्हाण यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही सातवी घटना असून कायम वीज वितरण विभाग अंग झटकण्याचे काम करत आहे. नुकसान भरपाई पोटी तुटपुंजी रक्कम देण्याचे काम विभाग करतो. यावर ठोस निर्णय घ्या असे कंत्राटी कामगार नेते अशोक सावंत यांनी सांगितले.