पालकांनी मुलांशी सुसंवाद साधला तरचं सुसंस्कृत, आदर्श समाजाची निर्मिती! - प्रा रुपेश पाटील यांचे पालकांना भावनिक आवाहन.

कलंबिस्त हायस्कूलचे स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात संपन्न
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 06, 2023 23:22 PM
views 231  views

सावंतवाडी : तालुक्यातील कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कलंबिस्त हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.

या स्नेहसंमेलनात सुप्रसिद्ध व्याख्याते तसेच  दै.कोकणसादचे उपसंपादक प्रा. रुपेश पाटील हे प्रमुख अतिथी होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष शिवाजीराव सावंत, उपाध्यक्ष गोविंद लिंगवत, सचिव यशवंत राऊळ,सहसचिव चंद्रकांत राणे,संचालक लाडजी राऊळ, वसंत सावंत, चंद्रकांत राऊळ, शशिकांत धोंड, कलंबिस्त सरपंच सपना सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नागिरी पक्षनिरीक्षक चित्रा बाबर-देसाई, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, रविंद्र म्हापसेकर, सौ. राणे मुख्याध्यापक अभिजीत जाधव आदी उपस्थित होते. 

       यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमावेळी उपस्थित असणारा तुळस ता. वेंगुर्ले येथील छोटा अवलिया, कोकरत्न, सुपरब्रेन विजय तुळसकर याची कोकणसाद लाईव्हचे  प्रा. रुपेश पाटील यांनी बौद्धिक चाचणी घेणारी छोटेखानी मुलाखत  घेतली. त्याने आपली अनोखी हार्मोनियम वादनाची कला देखील यावेळी सादर करुन रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद घेतली.

 कलंबिस्त हायस्कूलतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख अतिथी प्रा. रुपेश पाटील यांनी उपस्थित पालक, विद्यार्थी यांना बहुमूल्य प्रेरक मार्गदर्शन करताना आजच्या स्पर्धात्मक युगात चांगला माणूस बनण्याची स्पर्धा मोठी आहे. आदर्श व सुसंस्कृत समाजासाठी पालकांनी आपल्या पाल्याशी सुसंवाद साधणे गरजेचे आहे, असे भावनिक आवाहन केले.

तसेच यावेळी उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी मुलांना घडविण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे सांगत कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांतील यशाबद्दल गौरवोद्गार काढले व शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवालवाचन मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी केले. सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी तर आभार प्रदर्शन विलास चव्हाण यांनी केले.

 या पारितोषिक वितरण समारंभानंतर प्रशालेच्या विद्यार्थ्यांचा "कलादर्पण"हा विविध गुणदर्शनपर बहारदार कार्यक्रम सादर झाला. या सोहळ्यास पालक ,माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.


*विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने 'कलादर्पण' ठरले यादगार-*

बक्षीस वितरण समारंभानंतर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी 'कलादर्पण' हा अप्रतिम कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांचे प्रदर्शन करत उपस्थित पालक वर्ग व ग्रामस्थांची मने जिंकली. यात विद्यार्थ्यांनी सादर केलेले गायन, वादन, नृत्याविष्कार आणि नाट्यछटाविष्कार उपस्थित असलेल्या श्रोत्यांना प्रचंड भावली. अनेक पालक व रसिक जणांनी त्यांना आवडलेल्या कला प्रकाराला व विद्यार्थ्यांना भरघोस बक्षिसांची उधळण करीत खऱ्या अर्थाने कलादर्पण कलारसिकांचे मनात घर करून गेले. या आयोजनाबद्दल अनेकांनी मुख्याध्यापक अभिजीत जाधव व संपूर्ण शिक्षक वर्गाचे आभार मानत समाधान व्यक्त केले.