
दोडामार्ग : वझरे येथील "वेदांता" ने स्थानिकांना विविध कामाचे मक्ते द्यावे, स्थानिकांना रोजगार द्यावा या मागणीसाठी स्थानिकांनी मंगळवारी कंपनीच्या समोर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. दरम्यान त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त असून सकाळपासून सदर कंपनीत जाणाऱ्या गाड्या व त्यांचे चालक तसेच पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडत होती, सांयकाळी उशिरापर्यंत कंपनीकडून उपोषणकर्ते यांच्या मागण्यांबाबत योग्य तोडगा निघत नसल्याने उपोषण सुरू होत.
उपोषणकर्ते यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेली अनेक वर्षे योगेश महाले, लक्ष्मण गवस, अमर नाईक आदी पोट ठेकेदार म्हणून "जोशी" नामक ठेकेदाराकडे वहातुक व अन्य कामे करतात. मात्र गेल्या वर्षी ज्या कामांसाठी मोबदला दिला जात होता, यात यावर्षी दर कमी करण्यात आला. त्यामुळे आपली आर्थिक पिळवणूक होत असल्याचे संबंधित व्यावसायिकांचे म्हणणे आहे. शिवाय कंपनी आमच्या भागात आणि प्रमुख ठेकेदार गोवा व बाहेरचे हे चालणार नाही. म्हणूनच स्थानिक ग्रामस्थांसह आजपासून उपोषणाला सुरुवात केली. यावेळली त्यांनी आपल्या व्यथा मांडताना आता आम्ही मागे हटणार नसल्याचा इशारा दिला. दरम्यान काही काळ आत जाणाऱ्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केल्याने काहीवेळ वातावरण तंग बनले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जयेश ठाकूर यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आंदोलकांना समज दिली.
दरम्यान, याठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आंदोलनाला भेट दिली व आंदोलक तसेच कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. कोणत्याही परीस्थितित आपण आंदोलकांबरोबर असून पिळवणूक करणाऱ्या ठेकेदाराला याचा मोबदला चुकवावा लागेल, असे सांगत आंदोलन चिघळल्यास त्याला संबधित ठेकेदार जबाबदार असेल असे ठणकावले आहे. हा प्रश्न त्याने लवकारात लवकर मार्गी लावावा अन्यथा होणाऱ्या परिणांमाना सामोरे जावे असा इशारा आंदोलकानी दिला आहे.
दरम्यान आंदोलकांशी वेदांताचे व्यवस्थापक, तसेच बाबुराव धुरी, एकनाथ नाडकर्णी, सुधीर दळवी, संदीप गवस यांनी चर्चा केली, मात्र योग्य तोडगा न निघाल्याने आंदोलन उशिरापर्यंत सुरू होते. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासन या आंदोलनावर लक्ष ठेवुन होते. पोलीस उपनिरीक्षक जयेश ठाकूर यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे.