सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या घरी जाणाऱ्या रस्त्यातच ठेकेदारानं खाल्ला पैसा...?

Edited by:
Published on: July 22, 2023 18:05 PM
views 1777  views

सावंतवाडी : कारिवडे - पेडवेवाडीत स्विफ्ट गाडी स्लीप होऊन अपघात घडला. येथील रस्ता अतिशय खराब झाल्यानं रस्त्यावर खडी आल्यानं गाडी स्लिप होऊन विद्युत खांबावर आदळली. सुदैवानं यात कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हा अपघात घडला आहे.


हा वेंगुर्ला-बेळगांव महामार्ग मे महिन्याच्या एंडला व जूनच्या सुरुवातीला केला होता. पण, महिन्याभरातच हा रस्ता पावसाच्या पाण्यात वाहुन गेला. यासाठी सरकारनं दिलेला निधी याच रस्त्याच्या खड्ड्यात गेला. ह्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून बाईकस्वार जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. रत्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे व खडीचे साम्राज्य असल्याने गाडी चालवणे अतिशय अवघड झाले आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम असल्यानं आंबोलीत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गोवा राज्यातून बहुतांश पर्यटक या मार्गानं येतात. त्यामुळे रस्त्यांची झालेली अवस्था पाहता भविष्यात मोठा अपघात होऊन जीवीत हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.


हे काम अत्यंत निष्कृष्ट पद्धतीने करण्यात आल्याने पहिल्याच पावसात रस्ता बऱ्याच ठिकाणी खचला असून वाहून गेला आहे. त्यामुळे शासनाचा निधी वाया गेला असून याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आणि संबंधित खात्यातील अधिकारी असल्याचा आरोप भाजपा आंबोली मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी केला आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट देऊन संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले होते.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानाकडे जाणारा हा मार्ग आहे. साधारण ४० ते ५० दिवसांआधी केलेला रस्ता आतच खड्डेमय बनल्यानं कामाच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाल आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून भरघोस निधी विकासकामांना, रस्त्याच्या कामांसाठी दिला जात आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची कामही होत आहेत. काम न करणाऱ्यांना पालकमंत्री धारेवर धरत आहेत. मात्र, असं असताना सार्वजनिक बांधकाम मंत्र्याच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठेकेदारानं मलिदा खाण्यासाठी केललं बोगस काम उघड झालं आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी संबंधित ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.