
सिंधुदुर्ग : राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य, पोषणात सुधारणेसाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिकांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण' ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. प्रत्येक स्वीकार केंद्रांवर शासनाने दिलेले डिजिटल बोर्ड लावून जास्तीत जास्त लोकांपर्यंत अर्ज कसा भरावा,कोण लाभार्थी असेल, काय कागदपत्रे लागणारआहेत याची परिपूर्ण माहिती या बोर्डावर लावण्याची खात्री करावी जेणेकरुन लाभार्थी महिलांना अर्ज भरताना अडचण निर्माण होणार नाही अशा सूचना मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी दिल्या.
मुख्य सचिवांनी 'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण' या योजनेचा राज्य स्तरीय आढावा आज घेतला. यावेळी दूरदृष्य प्रणालीव्दारे सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा परिषद महिला बालकल्याण समन्वयक संतोष भोसले उपस्थित होते.
या योजनेच्या अनुषंगाने लाभार्थींची अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी ऑफलाइन अर्ज ग्राम व शहरी स्तरावर पहिल्यांदा १०० टक्के दाखल करून घ्यावेत, त्यानंतर ते ऑनलाईन भरण्याची कार्यवाही ग्रामपंचायत आणि नगरपंचायत स्तरावर करण्याचे नियोजन करावे, सदरच्या ऑफलाइन अर्जाचा स्वीकार करण्यासाठी अर्ज स्विकार केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत करावीत, ग्राम स्तरावर लाभार्थीची पडताळणीसाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, आशा आणि अंगणवाडी सेविका यांची समिती स्थापन केली जाणार आहे, राज्य स्तरावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून प्रसिध्दी करण्यात येणार आहे. त्याशिवाय जिल्हा स्तरावर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत योजनेची प्रचार व प्रसिध्दी करावी असेही श्रीमती सौनिक म्हणाल्या.
००००००