मुख्यमंत्र्यांनी दिला युवराजांना मान..!

लखमराजेंच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा 'नागरी सत्कार'
Edited by: विनायक गावस
Published on: June 06, 2023 16:55 PM
views 137  views

सावंतवाडी : शहराच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्कार समिती अध्यक्ष व सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोसले यांच्या शुभहस्ते हा नागरी सत्कार करण्यात आला. तर संत गाडगेबाबा भाजी मंडई संकुलाच्या भुमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराळ फोडण्याचा मान भाजपचे युवा नेते, युवराज लखमराजे सावंत-भोंसले यांना दिला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांच्या कामांची भूमिपूजन सावंतवाडीत करण्यात आली. शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई संकुल, हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त कै. रमाकांत आचरेकर क्रिकेट ड्रेसिंग रूम याशिवाय क्रीडा संकुलाचेही भूमिपूजन करण्यात आले. यातील २८ कोटीचं दोन टप्प्यांत उभारण्यात येणाऱ्या भव्य संत गाडगेबाबा महाराज भाजी मंडईच भुमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर,  आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार भरत गोगावले, आमदार रविंद्र फाटक आदींची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते शास्त्रशुद्धपणे भुमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी शेजारी उभ्या असलेल्या युवराज लखमराजे भोंसले यांना आवाहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दीपक केसरकर यांनी श्रीफळ फोडण्याची विनंती केली. युवराज लखमराजे यांना भुमिपूजन प्रसंगी हा मान देण्यात आला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार बाजारपेठेतील जयप्रकाश चौकात करण्यात आला. युवराज लखमराजे सावंत-भोसले यांच्या अध्यक्षतेखालील सत्कार समितीतील रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून हा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सावंतवाडीत आलेले एकनाथ शिंदे सावंतवाडीकरांच्या प्रेमानं भारावून गेले. भगवी शाल, श्रीफळ, गणेशाची मूर्ती आणि सावंतवाडीची ओळख असलेला 'गंजिफा' देत हा सन्मान करण्यात आला.मुख्यमंत्री शिंदे यांचा सावंतवाडी शहराला शंभर कोटीपेक्षा अधिक निधी दिल्याबद्दल त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला

याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,  आम. भरतशेठ गोगावले, आम. नितेश राणे, आम. रविंद्र फाटक, माजी खासदार निलेश राणे, सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, किरण ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे आदी उपस्थित होते.