विवाहितेला जाळल्याचं प्रकरण | संशयितास ४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 27, 2024 12:10 PM
views 357  views

मालवण : शहरातील बसस्थानक येथील एका डायग्नोस्टिक लॅबमध्ये काम करणाऱ्या सौभाग्यश्वरी गोवेकर (वय - ३५) रा. धुरीवाडा या विवाहितेवर पेट्रोल ओतून जाळल्या प्रकरणी अटकेत असलेल्या तिचा पहिला पती सुशांत सहदेव गोवेकर (वय-४०) रा. धुरीवाडा याला आज येथील न्यायालयात हजर केले असता ४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पूर्वाश्रमीची प्रीती केळुसकर ही विवाहिता बसस्थानक येथील एका लॅबमध्ये काम करत असताना तिचा पहिला पती सुशांत गोवेकर याने लॅबमध्ये जात तिच्या अंगावर प्लॅस्टिक बॉटल मधून आणलेले पेट्रोल ओतून लायटरने पेटवून दिले. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. गंभीररीत्या भाजलेल्या प्रीती यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 

याप्रकरणी मालवण पोलिसांनी सुशांत गोवेकर याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न करणे, खून करणे, ज्वलनशील पदार्थ टाकून गंभीर दुखापत करणे यासह अन्य कलमानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यात संशयित आरोपीने गुन्ह्यात वापरलेले वाहन, कपडे, अन्य साहित्य तसेच यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास करण्यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. त्यानुसार न्यायाधीश महेश देवकाते यांनी संशयित आरोपी सुशांत गोवेकर याला ४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे करत आहेत.