दुचाकीस्वाराला चक्कर ; दुचाकी जोरात धडकली टेम्पोला

जे घडलं ते भीषण
Edited by: मनोज पवार
Published on: May 31, 2025 18:35 PM
views 74  views

संगमेश्वर : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर पासून जवळच असलेल्या सह्याद्री पॅलेस समोर अशोक लेलँड टेम्पो आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दिनेश गजानन पांचाळ रा. कोळंबे, संगमेश्वर हे जखमी झाले असून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला येथील डॉक्टरांनी दिला आहे.

अपघाा शनिवारी, ३१ मे रोजी,  दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला.  अपघाताची भीषणता पाहता दुचाकीस्वाराचे नशीब बलवत्तर अशीच प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटली. 

दीपक कृष्णा सुतार, वय वर्ष 30 रा. कोल्हापूर हा तावडे ट्रान्सपोर्ट च्या अशोक लेलँड गाडी क्रमांक MH 9 EM/4478 टेम्पो घेऊन मुंबई -गोवा राष्ट्रीय माहामार्गावरून संगमेश्वर ते शास्त्रीपुल असे जात असताना सहयाद्री पॅलेस समोर त्याच्या गाडी समोर संगमेश्वर च्या दिशेने येणारी दुचाकी जोरात येऊन धडकली.

दुचाकीस्वार दिनेश गजानन पांचाळ रा.कोळंबे तालुका, संगमेश्वर हे चिपळूण एसटी आगारात वाहक म्हणुन काम करतात, ते MH 08B/D 7960 दुचाकी घेऊन  कामावरून चिपळूण ते संगमेश्वर येत असताना त्यांना चक्कर आल्याने दुचाकीवरील त्यांचा ताबा सुटूल्याने त्यांची दुचाकी थेट समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकली. एवढेच नाही तर दुचाकीचा काही भाग टेम्पोच्या पुढच्या चाकाखाली आला होता. तर दुचाकीवरील सामान, व हेल्मेट रास्त्यावर पडले होते.

अपघातग्रस्त दुचाकीस्वार दिनेश पांचाळ यांना तेथून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.  अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सासवे यांनी अपघातस्थळी दाखल होत. महामार्गाच्या दोन्ही बाजूला दूरपर्यंत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.