
कणकवली : नगरविकास दिनानिमित्त कणकवली नगरपंचायतला राज्यात प्रथम पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा सन्मान कणकवलीच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे. गेल्या पाच वर्षात न. पं. टीमने केलेल्या विकासात्मक कामाची पोचपावती राज्य सरकारने दिलेली आहे. नगरविकास विभागाने केलेला सन्मान हा कणकवलीकरांचा आहे. मिळालेला हा पुरस्कार आम्ही कणकवली शहरातील जनतेला सुपूर्द करत असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक रविंद्र ऊर्फ बाबू गायकवाड, विराज भोसले, संजय कामतेकर, मेघा गांगण, माजी नगरसेवक किशोर राणे, बंडू गांगण आदी उपस्थित होते. नगरविकास दिनानिमित्त राज्य सरकारचा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.दीपक केसरकर व प्रदान सचिव यांच्या उपस्थितीत हा सन्मान झाला आहे. हा पुरस्कार मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी स्वीकारला आहे. कणकवली नगरपंचायतने सन २०२२- २३ मध्ये रिंग रोड, क्रीडा संकुल, श्रीधर नाईक संकुल ,स्मशान भूमी सुशोभीकरण, आरोग्य, गारबेज डेपो, प्रशासकीय कर वसुली आणि अन्य केलेल्या कामांच्या आढावा राज्य सरकारने घेत हा सन्मान केला आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ. नितेश राणे यांनी वेळोवेळी दिलेला निधी यांच्यामुळे आम्हाला हे यश प्राप्त झाले आहे. नगरसेवक, मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांनी सांघिक काम केल्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. यापुढील काळात कणकवली नगरपंचायत चागलं काम करेल. या पुरस्कार हा कणकवली शहरांतील जनतेचा आहे. आमच्या टीमने योग्य कामे केल्याची पोचपावती राज्य सरकारने आम्हाला दिली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. असे समीर नलावडे यांनी सांगितले.