
सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील जागृत देवस्थान असलेले तथा नवसाला पावणारे अशी ख्याती असलेले श्री देव अग्निवेताळ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
आजगावच्या कैलासवासी मनोहर (भाई) भलाजी पायनाईक यांनी सन २००६ साली पांढरेवाडीत श्री देव अग्नीवेताळ यांचे मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेतला. त्यानंतर सध्या हे मंदिर पूर्णत्वास येत असून त्याच्या उभारणीसाठी अनेक दाते पुढे येत आहेत. गुरुवारी मोठ्या भक्ती भावात व उत्साहपूर्ण वातावरणात श्री देव अग्नीवेताळचा वार्षिक महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी देवस्थान समितीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळी नऊ वाजता धार्मिक विधी, दुपारी एक वाजता आरती, महागाऱ्हाणे तसेच महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. संध्याकाळी केळी ठेवणे, ओट्या भरणे असे अनेक कार्यक्रम पार पडले.
रात्री पालखी प्रदक्षिणा व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर आजगावकर दशावतार मंडळाचा दणदणीत दशावतारी नाट्य प्रयोगही संपन्न झाला.
यावेळी आजगाव दशक्रोशीतील अनेक भाविकांनी आणि भक्तगणांनी या जत्रोत्सवाचा लाभ घेतला. जत्रोत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष दिवाकर कृष्णा पांढरे, सचिव प्रमोद गोपाळ पांढरे, खजिनदार विष्णू सहदेव पांढरे, ग्रामपंचायत सदस्य अनंत पांढरे व श्री देव अग्निवेताळ देवस्थान कमिटीने प्रयत्न केले. यावेळी मुंबई, गोवा, कर्नाटक अशा विविध भागातून मोठ्या संख्येने भक्तगणांनी जागृत देवस्थान असलेल्या श्री देव अग्नी वेताळ यांचे आशीर्वाद घेतले.
देणगीसाठी अधिक माहिती..