प्रलंबित फळपीक विम्याची रक्कम ८ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

जिल्हाधिकाऱ्यांची ठाकरे शिवसेनेला ग्वाही
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 20, 2025 20:20 PM
views 34  views

सिंधुदुर्गनगरी : पुनर्रचित हवामानावर आधारित आंबा, काजू  फळपीक विमा योजना  सन २०२३-२४ अंतर्गत  आंबा पिकामध्ये ३ हजार शेतकरी व काजू पिकामध्ये साधारण ९०० शेतकऱ्यांना अद्यापही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही याबाबत आज शिवसेना नेत्यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन  २८ जानेवारी २०२५  पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात  फळपिक विम्याची प्रलंबित रक्कम जमा करण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी कृषी अधिकारी श्री खुटकुटे यांच्याशी चर्चा करून पुढील ८ दिवसांत फळपिक  विम्याचे पैसे वंचित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची ग्वाही दिली आहे. मात्र दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यास  २९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, सुशील चिंदरकर, बाबू आसोलकर, सचिन आचरेकर आदी उपस्थित होते.