
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर जानवली येथे दुचाकी आणि कार यांच्यात ९ जानेवारी रोजी समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले होते. त्यातील संजयकुमार सीताराम राजभर (३१) या तरुणाचा मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
सर्वेश संजय डिचवलकर (२५, रा.हरकुळ खुर्द) आणि संजयकुमार सीताराम राजभर (३१,सध्या;रा.हरकुळ बुद्रुक) हे जानवली येथील मुंबई ते गोवा या विरूद्ध दिशेच्या लेन वरून दुचाकी घेऊन साकेडी फाटा येथील मिडलकट ओलांडून गोवा ते मुंबई या लेनवर जात होते. त्याचवेळी मुंबई ते गोवा या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीसह दोघे दहा ते पंधरा फुट पुढे फरपटत गेले. या अपघातात दुचाकी आणि कारचे मोठे नुकसान झाले. तर दुचाकीवरील सर्वेश व संजयकुमार जखमी झाले होते. सर्वेश याला कणकवली येथील खासगी रूग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा - बांबुळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर संजयकुमार याच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती कणकवली पोलिस ठाण्यात अमित रामप्रित राजभर याने दिली.










