
दोडामार्ग : दोडामार्गमध्ये दिल्ली लॉबीच्या रुपाने येथील जमीन खरेदीसाठी येणारे गुंतवणुकदार म्हणजे सह्याद्रीच्या रांगांमधील समृध्द गावांना लागलेली कीड आहे. स्थानिकांनी पुढाकार घेवूनच ही कीड मुळापासून उखडून फेकली पाहिजे. या लढ्यात कोलझर बरोबरच पंचक्रोशीतील गावांच्या पाठिशी ठामपणे उभा राहीन असा विश्वास वनशक्ती संस्थेचे प्रमुख स्टॅलीन दयानंद यांनी कोलझर येथे दिला.
दिल्ली लॉबीच्या विरोधात कोलझर गावाने एल्गार पुकारला आहे. रक्ताच्या नात्याबाहेर कोणालाही जमीन विकणार नाही, अशी शपथ त्यांनी ग्रामदैवतासमोर घेतली आहे. त्यांच्या या लढ्याला पाठबळ देण्यासाठी ग्रामस्थांच्या विनंतीवरून काल मंगळवार 13 जानेवारी रोजी स्टॅलीन आले होते. यावेळी स्थानिकांना त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘’सह्याद्रीच्या या समृध्द भागात जन्म घेणे भाग्याचे आहे. या भागाचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी स्थानिकांवरच आहे. आम्ही व्याघ्र कॉरीडॉरसाठी न्यायालयात दिर्घ लढा दिला. त्यानंतर हा परिसर इकोसेन्सिटीव्ह एरियामध्ये समाविष्ट झाला. असे असले तरी गाफील राहून चालणार नाही. दिल्ली लॉबीच्या रुपाने खूप मोठी आर्थिक लॉबी या समृध्द भागावर डोळा ठेवून आहे. ते आले तर येथील गाव, त्यातील गावपण, पर्यायाने जंगल आणि पर्यावरण नष्ट होणार आहे. त्यामुळे हे गुंतवणूकदार म्हणजे या भागाला लागलेली कीड आहे. स्थानिकांनी ती वेळीच काढून फेकून दिली पाहिजे. त्यांच्या लढ्याला आमच्यापरिने पूर्ण ताकदीने मदत दिली जाईल.”
ते म्हणाले, “कोलझरवासियांनी घेतलेला निर्णय खरोखरच स्वागतार्ह आणि अनुकरणीय आहे. यात तरुणांचा असलेला सहभाग खूप काही सांगून जाणारा आहे. इथल्या तरुणांनी नवा आदर्श घालून दिला आहे. नवी पिढी चुकीच्या दिशेला जात असल्याचा माझा समज कोलझरमधील युवकांनी खोटा ठरवला. याचा अर्थातच मला आनंद आहे. या निर्णयाशी कायम ठाम रहा. कोलझरच्या पर्यावरण संवर्धनासाठी माझे पाठबळ कायम गावासोबत असेल.”
स्टॅलीन म्हणाले, “पर्यावरण हे अंतिम सत्य आहे. या भागात असलेले समृध्द पर्यावरण नष्ट झाले तर पुन्हा उभे करता येणार नाही. या निसर्गात तुमच्या भागाला आणखी श्रीमंत करण्याची ताकद आहे. अगदी येथील निर्मळ जल विकले तरी पैसा मिळणार आहे. पर्यटन व इतर क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत. या जमिनी विकल्या तर येणारे पैसे फार काळ राहणार नाही. रेडी येथे खनिज उत्खननामुळे झालेली दुरावस्था याचे उदाहरण म्हणता येईल. गावाच्या संरक्षणासाठी तुम्ही कायम सतर्क रहा.”
यावेळी पर्यावरणवादी कार्यकर्ते संदीप सावंत यांच्यासह देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शामराव देसाई, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी. पी. देसाई, कुंब्रलचे माजी सरपंच प्रवीण देसाई आदी उपस्थित होते. गावाच्यावतीने स्टॅलीन व श्री. सावंत यांचा सत्कार करण्यात आला. श्री. सावंत यांनी यावेळी बोलताना पंचक्रोशीतील व्याघ्र कॉरिडॉरमध्ये येणार्या गावांची समन्वय समिती स्थापन करणे आवश्यक असल्याचे सांगून त्यात कोलझरवासियांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. यावेळी शामराव देसाई, पी. पी. देसाई, आपा देसाई यांनी मनोगत मांडले. स्वागत सुदेश देसाई यांनी तर आभार सिध्देश देसाई यांनी मांडले.
इकोसेन्सिटीव्हबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न
यावेळी श्री. स्टॅलीन यांना कोलझर गावामधील पर्यावरण समृध्द स्थळांची माहिती देण्यात आली. या सगळ्याचे शास्त्रीय पध्दतीने मॅपींग करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या संस्थेतर्फे गावाला सगळी मदत पुरवली जाईल. त्याचा येथील पर्यावरण समृध्दी टिकवण्यासाठी फायदा होईल असे सांगितले. ग्रामस्थांच्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, की इकोसेन्सिटीव्हबाबत गैरसमज पसरवला जात आहे. येथील ग्रामस्थ पर्यावरण पूरक आयुष्य जगत आले आहेत. याला या निर्णयाचा कोणताही धक्का बसणार नाही. अर्थात मोठ्याप्रमाणात होणार्या वृक्षतोडीला मात्र निर्बंध आहेत.
वृक्षतोड, उत्खनन न्यायालयाकडे मांडणार
कार्यक्रम संपल्यानंतर स्टॅलीन यांनी उत्खनन झालेल्या ठिकाणी जावून परिस्थितीची पाहणी केली. येथील वृक्षतोड, खनिजयुक्त मातीचे उत्खनन हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. ही सगळी स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.










