कणकवलीतील 'तो' जीवघेणा हल्ला ठेकेदारीच्या वादातून

8 ते 9 जणांविरोधात गुन्हा दाखल
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 11, 2024 14:53 PM
views 1072  views

कणकवली : कणकवली बांधकरवाडी येथील फिर्यादी चेतन दिलीप पावर (वय २५) व त्याच्यासोबत असलेले सुनील चव्हाण यांच्यावर १० मार्चला रात्री ८ वाजता शासकीय ठेकेदारीच्या वादातून जीवघेणा हल्ला झाला आहे. हा हल्ला संशयित आरोपी रणजीत जाधव, लक्ष्मण सुळ (रा. वळवंडे तालुका देवगड ) यांच्यासह ८ ते ९ जणांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी चेतन दिलीप पवार हे आपल्या जीसेबी ऑपरेटर सुनील चव्हाण हे दोघे दत्तकृपा निवारा शेड मध्ये सोबत बसले होते.त्यावेळी तीन कारमधून आरोपींसह ८ ते ९ लोक आले होते. फिर्यादी चेतन पवार यांनी डिसेंबर २०२३ मध्ये देवगड शासकीय कामाचा ठेका भरला होता. त्या ठिकाणी फिर्यादी आणि आरोपी यांच्यात ठेका भरल्यावरुन वाद झाला होता.त्यावेळीचा मनात राग ठेवून आरोपी यांनी तू देवगड मध्ये येऊन टेंडर का भरतोस अशी विचारणा केली ? तसेच शिवीगाळ करीत आरोपी याने स्कॉर्पिओ गाडीतून लाकडी दांडके घेऊन येत तोंडाला रुमाल बांधून आलेल्या आरोपींनी लाकडी दांड्याने व दगडाने मारहाण करीत फिर्यादीला गंभीर दुखापत केली.

याप्रकरणी कणकवली पोलिसानी गुन्हा  दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत.