'जनसुरक्षा' विरोधात ठाकरे शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन

Edited by: मनोज पवार
Published on: September 11, 2025 15:13 PM
views 101  views

मंडणगड :  महाराष्ट्र शासनाने मांडलेले जनसुरक्षा विधेयक रद्द करावे या मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तालुका मंडणगड यांच्यावतीने 10 सप्टेंबर 2025 रोजी तहसिलदार अक्षय ढाकणे यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकरिता निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात विद्यमान सरकारने सामाजीक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करुन हुकुमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी हे विधेयक आणले असल्याचे नमुद करण्यात आले आहे. 

सरकार या कायद्याचा उपयोग विरोधक, डाव्या संघटना, आणी डाव्या संघटनांशी संबंधीत लोकांना तसेच सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरीक व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना अटक करुन दडपशाही करण्याची भिती व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे घटनाविरोधी व लोकशाहीस बाधक विधेयक असून ते तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे. 

या निवेदनावर तालुकाप्रमुख संतोष गोवळे, तालुका संघटक जितेंद्र दवंडे, उपतालुका प्रमुख रघूनाथ पोस्टुरे, संदीप वाघे, संजय सापटे, लक्ष्मी भुच्या, सुषमा राणे, मारुती तांबीटकर, अनिल गोरिवले, शशिकांत बामणे, किशोर महाडीक, सिध्दार्थ शिंदे, अमित चिले, प्रकाश महाडीक, विलास सावंत यांच्या सह्या आहेत.