
दोडामार्ग : तालुक्यातील जनतेचा संताप आता उफाळून येणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष उद्या (१४ ऑगस्ट) दोडामार्गात “ढोल बजावो आंदोलन” करून शासनाच्या निष्क्रियतेविरोधात रणशिंग फुंकणार आहे. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ व दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक सकाळपासून विविध शासकीय कार्यालयांसमोर ढोल वाजवून प्रशासनाला त्यांच्या दिरंगाईचा जाब विचारणार आहेत.
तालुक्यातील वीज वितरण कार्यालयावरील वाढीव बिलांचा लूटमार आणि अदानी कंपनीच्या वीज मीटरांचा थोपवलेला त्रास याविरोधात शिवसैनिक संतप्त आहेत. तहसीलदार पद रिक्त असल्याने तालुक्याचा कारभार विस्कळीत झाला असून, तातडीने नवीन तहसीलदार नेमण्याची मागणी केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांवरील खड्डे व वाढलेली झाडी प्रवाशांच्या जीवाशी खेळत असून, या बेफिकिरीवरही जोरदार हल्ला चढवला जाणार आहे.
दरम्यान, वनविभागाकडून हत्ती पकड मोहिमेत होणारा विलंब, हत्ती बाधित भागातील हाकारी पथके कमी असणे, हाकारींना गणेशोत्सवासाठी अतिरिक्त मानधन न देणे, तसेच परप्रांतीयांकडून होणारी बेकायदेशीर झाडतोड यावरही शिवसेना आंदोलनात सरकारला कोंडीत पकडणार आहे. वाढीव नुकसानभरपाई त्वरित देण्याचा इशाराही देण्यात येणार आहे.
ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजीसह आणि थेट इशाऱ्यांच्या वर्षावात होणाऱ्या या आंदोलनासाठी तालुक्यातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी आणि जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधासभा प्रमुख रुपेश राऊळ व तालुकाप्रमुख संजय गवस यांनी केले आहे.