नांदगावातील अवैध धंद्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 23, 2023 11:30 AM
views 488  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे अवैधरित्या होणारे दारू, मटका ,जुगार ,गुटखा  विक्री पोलिसांनी त्वरित बंद करण्याची मागणी नांदगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने  पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते सतीश सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले, उपविभाग प्रमुख तात्या निकम,सरपंच चंद्रकांत डामरे, प्रदीप हरमलकर,राजा म्हसकर व  शिवसेना नांदगाव पंचक्रोशीतील सर्व शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना दिलेल्या निवेदनात खालील मागणी केली,त्यात कणकवली मधील मौजे नांदगाव येथे राजरोस पणे अवैध धंदे सुरु आहेत. या ठिकाणी शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सतत ये- जा मोठ्या प्रमाणावर असते.तसेच नांदगाव एक पंचक्रोशीतील बाजारपेठ म्हणुन ओळखली जाते. त्याचप्रमाणे जिल्हा आणि राज्याच्या इतर भागात प्रवास करणा-यांमध्ये महिला, तरूण मुले, जेष्ठ नागरिक यांचीही सतत प्रवाशांची वर्दळ सुरु असते. पंचक्रोशीतील नागरिकांची या ठिकाणी दैनंदिन गरजेच्या खरेदी-विक्री करिता मोठी गर्दी असते. अशा या गजबजलेल्या जागी गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची खुलेआम विक्री चालू असते . याच्यावर दारू विक्री बाबत गुन्हे दाखल आहेत. तरी देखील कारवाई होत नाही,तसेच  नांदगाव पंचक्रोशी व बाजारपेठमध्ये मोठ्याप्रमाणावर राजरोसपणे मटका चालू आहे. हे बेकायदेशीर आणि अनधिकृत गैरव्यवसाय लवकरात लवकर बंद करावे, गैर व्यवसाय विरुद्ध संबंधित लोकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत.


मुंबई गोवा मार्ग क्र. ६६ महामार्गासाठी बांधण्यात आलेल्या ब्रीज खाली उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागेत दारू विक्रीचा अनधिकृत व्यवसाय मोठया प्रमाणात चालू आहे तसेच या जागेवरूनच पंचकोशीत सुद्धा होलसेल अनधिकृत दारू विक्रीसाठी नेण्यात येते. पंचक्रोशीतील बहुतांशी नागरीक तरूण वर्ग दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत तसेच या दारू विक्रीसोबत मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री अनधिकृत राजरोसपणे चालू आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे येथे हिंदू व मुस्लिम बांधव एकोप्याने व प्रेम भावनेने राहतात पण व्यसनी नागरीक दारूच्या नशेत शिवीगाळ करतात व असभ्य चुकीचे शब्द वापरले जातात त्यामुळे येथे भविष्यात जाती-जातीमधे. तेढ निर्माण होवू शकते.

तसेच आता सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे वाहतुक व नागरिकांच्या गर्दीचे प्रमाण सुद्धा वाढत आहेत त्यात हे अनधिकृत धंदे चालू आहेत या सर्व गोष्टींमुळे सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडले जात आहेत. या बेकायदेशीर कृत्यांना राजकीय पाठबळ लाभत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आपण स्वतः या चालत असलेले अनाधिकृत व बेकायदेशीर धंदे त्वरित बंद करावेत व असे धंदे चालवत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कार्यवाही करावी. तसेच या ८ दिवसात आपण हे बेकायदेशीर धंदे बंद केले नाहीत किंवा धंदे चालवणाच्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कार्यवाही केली नाही तर आम्ही युवा पिढी बाद होऊ नये यासाठी दि. ०४ सप्टेंबरला २०२३ रोजी पोलीस ठाणे कणकवली येथे मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.