वैभववाडीतील 'या' गावात बिबट्याचा हैदोस

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 13, 2022 13:17 PM
views 2066  views

वैभववाडी : उंबर्डे गावात गेले चार दिवस बिबट्याने हैदोस घातला आहे. भुतेश्वरवाडी परिसरात बिबट्याचा वावर आहे. यामुळे याभागातील ग्रामस्थ भयभीत झाले आहे. वनविभागाची टिम दिवसरात्र याठिकाणी ठाण मांडून आहे. मात्र बिबट्याला हुसकावून लावण्यात यश आले नाही. आज या भागात पिंजरा लावून त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून केला जाणार आहे.

कुसुरनंतर बिबट्याने आपला मोर्चा उंबर्डेकडे वळविला आहे. या भागात गेले चार दिवस बिबट्याचा वावर आहे. दोन बिबटे असून ते रात्रीचे ग्रामस्थांच्या नजरेस पडत आहेत. मनुष्यवस्तीत ते वावरत आहेत. येथील भुतेश्वरवाडीत गेल्या चार दिवसांपासून त्यांनी ठाण मांडला आहे. दोन बिबटे असून ते नर -मादी असण्याचा वनविभागाचा अंदाज आहे. तसेच त्यांची पिल्ले या परिसरात असू शकतात. त्यामुळे त्यांचे या भागात वास्तव्य वाढलेले आहे. बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी गेले चार दिवस वनविभागाची टिम कार्यरत आहे.

यामध्ये वनपाल एस एस वागरे, वनरक्षक अनिल काकतीकर, वनरक्षक किरण पाटील, उत्तम कांबळे, वनमजूर कृष्णांत पाताडे, समाधान वाघमोडे यांचा सहभाग आहे. दिवसरात्र हे पथक या भागात गस्त घालत आहेत.आज सायंकाळी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती श्री वागरे यांनी दिली.