चिंताग्रस्त सावंतवाडीकरांना तुर्तास दिलासा

करवाढीला तात्पुरती स्थगिती ; शिक्षणमंत्र्यांची माहिती
Edited by: विनायक गांवस
Published on: March 06, 2023 20:19 PM
views 193  views

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करण्यात आली होती. याला स्थगिती मिळावी यासाठी सर्वपक्षीयांसह नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. ही दरवाढ रद्द करावी अशी मागणी केली होती. दरम्यान, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या दरवाढीस स्थगिती द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या पत्राचा संदर्भ देत प्रशासक डॉ. जयकृष्ण फड यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या करवाढीस स्थगिती देण्याबाबतच पत्र दिल आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर व पाणीपट्टी यासंदर्भात जी करवाढ प्रस्तावित केलेली आहे त्या करवाढीस या आदेशान्वये तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे.


नगरपरिषद प्रशासनानं पाणीपट्टी व घरपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. २५ ते ३९९ रूपये घरपट्टी असणाऱ्यांना सरसकट ४०० रूपये भरावे लागणार होती. तर कॉम्प्लेक्समध्ये २५ ते ७९९ रूपये स्क्वेअर फूट नुसार आकारली जाणारी घरपट्टी सरसकट ८०० रूपये करण्यात येणार होती. याची झळ मालकांसह भाडेकरूंना देखिल सहन करावी लागणार होती. महाराष्ट्रातील एकमेव फायद्यात चालणारी पाळणेकोंड धरण येथील नळपाणी योजना सावंतवाडीची असताना सुद्धा पाणी पट्टीतही सरासरी ३ रूपयांची वाढ केली होती. अग्निशमन सुरक्षा करही घरपट्टीत आकारण्यात आला होता. त्यामुळे नागरिक चिंतेत होते. आज अखेर याला तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर लोकांना दिलासा मिळाला आहे. 


याबाबत करवाढीस स्थगिती देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांना योग्य ते आदेश देण्यात यावेत. तसेच करवाढ रद्द करणेसंदर्भात जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, मुख्याधिकारी, सावंतवाडी व प्रांताधिकारी तथा प्रशासक, सावंतवाडी यांची बैठक, मुंबई येथे आयोजित करून मलाही या बैठकीस आमंत्रित करावं अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती.