
वैभववाडी : तालुक्यातील नापणे धबधब्यावर उभारलेल्या काचेच्या पुलाची तहसीलदार सुर्यकांत पाटील यांनी आज पाहणी केली. यानंतर येथील सुरक्षेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस व ग्रामपंचायत यांची एकत्रित बैठक घेऊन येथील सुरक्षेबाबत सूचना दिल्या.
महाराष्ट्रातील पहिला काचेचा पुल तालुक्यातील नापणे धबधब्यावर झाला.हा पुल पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे येत आहेत.त्यादृष्टीने खबरदारी म्हणून काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.त्यानुसार तहसीलदार पाटील यांनी आज तहसील कार्यालयात बैठक घेऊन संबंधित विभागांना सुचना दिल्या.या बैठकीला पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता विनायक जोशी,शुभम दुडये,नापणे सरपंच प्रदीप जैतापकर,सुरेश जैतापकर आदी उपस्थित होते.याबैठकीत श्री जोशी यांनी काचेच्या पुलावर एकावेळी २५ पर्यटकांनी आनंद घ्यावा.गर्दीच्या वेळी १५ ते वीस मिनिटेच पुलावर थांबावे,पुलावरून चालताना सावकाश चालावे,रेलिंगचा आधार घेवुन उभे राहावे,पुलावर बसुन कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करू नये,काचेला धोका होईल असे कोणतेही अवजड वस्तु पुलावर नेऊ नयेत,पुलावर उड्या मारणे,लोंबकळणे टाळावे,परिसर स्वच्छ ठेवावा अशा आशयाचे फलक लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.










