
देवगड : देशातील शिक्षकांना आता शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. असे प्रतिपादन कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष आकाश तांबे यांनी नागपूर येथील कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या विदर्भ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना आपले मत व्यक्त केले.
30 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथे ऑरेंज सिटी टॉवर,पंचशील चौक नागपूर येथे कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या विदर्भ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन राज्याध्यक्ष आकाश तांबे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी राज्य अध्यक्ष आकाश तांबे यांनी मार्गदर्शन करताना कास्ट्राईबच्या कार्यकर्त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन निर्णय, सेवाशर्ती नियमावली यांचा चांगला अभ्यास करावा तरच प्रशासनावर दबाव निर्माण होईल.सद्या शिक्षकांच्या बाबतीत अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षा सर्वांना अनिवार्य केली आहे.त्यामुळे देशभरातील शिक्षक त्रस्त झाले आहेत. देशातील शिक्षकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा या विचारांची गरज आहे. राज्यातील शिक्षकांना अतिरिक्त अशैक्षणिक कामांचा ताण आहे. वेगवेगळी ऍप, ऑनलाइन कामे, १५ मार्चचा संच मान्यता निकष ठरवणारा शासन निर्णय राज्यातील शिक्षण व्यवस्था मोडीत काढणारा आहे. अशावेळी राज्यातील सर्व शिक्षकांची संघटित होऊन आंदोलन केले पाहिजे.
कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आकाश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष किरण मानकर, अतिरिक्त सरचिटणीस तुषार आत्राम, नागोराव कोम्पलवार, राजकुमार उमरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कास्ट्राईब शिक्षक संघटनेची विदर्भ विभागीय सभा झाली. यावेळी नागपूर जिल्हा कार्यकारिणी चा विस्तार करण्यात आला.जिल्हाध्यक्ष संतोष आत्राम, सरचिटणीस धर्मराज सातपुते, उपाध्यक्ष नितीन अष्टनकर सहसचिव , राहुल बाराई अशी २१ जणांची नागपूर जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष संतोष अत्राम यांनी नागपूर जिल्हाच्यावतीने राज्याध्यक्ष आकाश तांबे, कार्याध्यक्ष किरण मानकर यांचा सत्कार केला. कार्याध्यक्ष किरण मानकर यांनी आपल्या भाषणात कास्ट्राईब ही फुले- शाहू-आंबेडकर विचारांची चळवळ आहे. कास्ट्राईब शिक्षक संघटनेची भूमिका, ध्येय, धोरणे सांगितली. यावेळी अनेक पदाधिकारी यांनी आपले विचार मांडले. या बैठकीचे सूत्रसंचालन तुषार अत्राम (जिल्हाध्यक्ष यवतमाळ) यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश भालेरोव (जिल्हाध्यक्ष भंडारा ) यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विदर्भातून यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला ,अमरावती या जिल्ह्यातून संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.










