सिंधुदुर्गच्या टॅक्सी ड्रायव्हरना गोव्यात आर्थिक भुर्दंड...?

▪️ जिल्ह्यातील नेतेमंडळींकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा
Edited by: विनायक गावस
Published on: March 02, 2024 14:12 PM
views 820  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गातील शेकडो बेरोजगार तरुण नोकरी-धंद्यानिमित्त जवळच्या गोवा राज्यावर अवलंबून आहेत. खासकरून अनेक वाहनचालक गोव्यात परमिटच्या गाड्या चालवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. महिना दहा ते पंधरा हजार पगारावर ते नोकरी करत आहेत. मात्र, त्यांचे वाहन परवाने (लायसन्स बॅच) MH 07 असल्याने गोवा आरटीओकडून दंड आकारला जात आहे. त्यामुळे या ड्रायव्हरांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्ह्यातील टॅक्स चालकांकडे MH07 या बॅच आहे. तो बॅच गोवा वाहतूक पोलीस गृहीत धरत नाही. त्यामुळे दंड आकारला जात असुन हा बॅच गोव्यात सामाविष्ट करुन घेण्याविषयी प्रयत्न व्हावेत अशी मागणी चालकांची आहे.

यात काहीवेळा दहा हजार इतका ही दंड ठोठावला जात आहे. हा दंड सामान्य माणसाला परवडत नाही. काही टॅक्सी ड्रायव्हर दररोज गोवा ते सिंधुदुर्ग ये-जा करतात, काही भाड्याने रुम घेऊन राहतात. वाढत्या महागाईमुळे दहा ते पंधरा हजार पगारावर त्यांच भागत नाही. त्यातच आरटीओला दंड भरावा लागत असल्याने सिंधुदुर्गातील वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे अशी भावना सिंधुदुर्गवासिय असणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरनी व्यक्त केलीय. तर यावर जिल्ह्यातील राजकीय नेतेमंडळींनी गोवा सरकारशी बोलून तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

एकंदरीत, सिंधुदुर्गतील बेरोजगार तरुणांना नोकरी निमित्त गोवा राज्य हा एकमेव जवळचा पर्याय आहे. त्यात सिंधुदुर्ग व गोवा एकमेकांवर अवलंबून आहेत. अशात सिंधुदुर्गवासियांना गोवा आरटीओकडून वाहन परवाना बॅचमुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जो आमच्या सिंधुदुर्गवासियांना परवडणारा नाहीय. त्यामुळे जिल्ह्यातील नेतेमंडळींनी सिंधुदुर्गच्या टॅक्सी ड्रायव्हरना दिलासा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण आवश्यक बनले आहे.