नितेश राणेंच्या दुर्लक्षामुळेच तळेरे-वैभववाडी-गगनबावडा महामार्गाची दुरवस्था : मंगेश लोके

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 15, 2023 20:08 PM
views 131  views

वैभववाडी : आमदार नितेश राणे यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच तळेरे-वैभववाडी-गगनबावडा महामार्गाची दुरावस्था झाली आहे.या रस्त्याच्या आजच्या परिस्थितीला तेच कारणीभुत आहेत. दरवर्षी स्टंटबाजी करणारे आमदार यावर्षी या विषयासंदर्भात गंभीर नाहीत अशी टीका ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केली आहे.

 तळेरे-वैभववाडी-गगनबावडा महामार्ग दयनीय अवस्था झाली आहे. गेली तीन चार वर्ष या मार्गाची अशीच दुरावस्था होत आहे. आता तर या महामार्गावरून वाहतुक करणे अवघड बनले आहे. रस्त्याला १० ते १२ फुट रूंदीचे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेस आमदार राणेच कारणीभुत आहेत. या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणुन जर त्यांनी या रस्त्यांकडे वेळीच लक्ष दिले असते तर या महामार्गाची अशी दुरावस्था झाली नसती. मात्र आमदार राणेंना स्टंट करण्यात रस असतो. रस्ता दुरूस्ती करून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही अशी टीका श्री.लोके यांनी केली. तळेरे-गगनबावडा रस्त्यांच्या दुरावस्थेंसंदर्भात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक अधिवेशनात बांधकाममंत्र्यांना प्रश्न विचारतात.मात्र येथील आमदारांना प्रश्न विचारायला वेळ मिळत नाही.तळेरे-कोल्हापुर हा महामार्ग आहे.या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतुक होते. मात्र त्या तुलनेत या महामार्गाच्या दुरूस्तीची कामे दर्जेदार होत नाहीत. गेल्या वर्षी करूळ घाटात दोन कोटी रूपये दुरूस्तीवर खर्च करण्यात आले.परंतु स्थानिक लोकप्रतिनिधीचा लक्ष नसल्यामुळे संपुर्ण काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सध्या या महामार्गावरील  खड्डे मुरूम व खडी टाकुन भरले जात आहेत. परंतु ही खड्डे आठ दिवस देखील टिकणार नाहीत. त्यामुळे हे खड्डे पावसाळी डांबराने भरावे अशी आमची मागणी आहे. जर येत्या आठ दिवसांत डांबराने खड्डे भरले नाही तर शिवसेना आंदोलन छेडेल असा इशारा श्री.लोके यांनी महामार्ग प्रधिकरणला देखील दिला आहे.

    जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मंत्री झाल्यानंतर  वैभववाडीत एकदाही आलेले नाहीत.त्यांनी तालुक्याचा प्रशासकीय दौरा देखील केलेला नाही.बांधकाम मंत्री असणा-या मंत्री चव्हाण यांनी एकदा तरी वैभववाडीत यावे. त्यामुळे या महामार्गाची स्थिती तरी समजेल असा उपरोधिक टोला लोके यांनी लगावला.