
वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. परंतु हे काम दर्जेदार होत नसल्याचा आरोप भाजपचे गुलाबराव चव्हाण यांनी करीत ठेकेदाराला धारेवर धरले. कामाच्या ठिकाणीच काही काळ वाहने रोखून त्यांनी कामाबाबत ठेकेदाराची कानउघडणी केली. तसेच घाट मार्गातील खड्डे बुजविण्याचे काम आधी सुरू करा अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा इशारा श्री. चव्हाण यांनी दिला.
तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गची अवस्था दयनीय झाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे तालुक्यातील ऊस तोडणी रखडली आहे. वाहनांचेही अपघात वारंवार होत आहे. याबाबत राजकीय पक्ष, व्यापारी ,शेतकरी यांनी वेळोवेळी आवाज उठवला. अखेर दोनदिवसापासून या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. आज रेल्वे फाटकानजीक काम सुरू असताना माजी बँक संचालक गुलाबराव चव्हाण हे या मार्गावरून जात होते. खड्डे बुजविण्याचे काम करीत असताना ठेकेदाराकडून दर्जेदार काम होत नसल्याचे पाहून त्यांनी आपले वाहन थांबवून त्याचा जाब विचारला. ठेकेदार व बांधकाम कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.तसेच करुळ घाटातील खड्डे जोपर्यंत भरले जात नाही तोपर्यंत हे काम करू नये. तुमच्यामुळे येथील शेतकऱ्यांचा ऊस गाळपाला जाण्यापासून रखडला आहे. तो मार्ग सुस्थितीत करा मगच या भागातील कामाला सुरवात करा.अन्यथा संबंधित ठेकेदार व अधिका-यांची गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा. असा इशारा श्री चव्हाण यांनी दिला.सुमारे पंधरा ते वीस मिनिटे श्री चव्हाण यांनी मार्ग रोखून धरला होता. अखेर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घाट मार्गातील काम उद्यापासून सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर श्री .चव्हाण हे शांत झाले. त्यांनी रोखून धरलेली वाहतूक मार्गस्थ केली.