LIVE UPDATES

महिनाभर रजेवर असलेला तलाठी हजर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेच्या मागणीला यश
Edited by: दिपेश परब
Published on: June 11, 2026 20:10 PM
views 128  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावातील तलाठी गेला १ महिना रजेवर असल्याने शेतकरी, विद्यार्थी यांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. दरम्यान याबाबत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय यांनी तहसीलदार ओंकार ओतरी यांचे लक्ष वेधले होते. या मागणीला यश आले असून शाळा सूरु होण्यापूर्वी म्हणजेच आज गुरुवारी केशव धुमाळे हे तलाठी तुळस येथे हजार झाल्याने शेतकरी संघटनेच्या मागणीला यश आले आहे. 

गेला एक महिनाभर तलाठी तुळस येथील धुमाळे तलाठी रजेवर असल्याने शेतकरी व ग्रामस्थांचे गैरसोय होत होती. तुळस गावामध्ये ४४०९ लोकसंख्या असून यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे उत्पन्न दाखले व पीक कर्ज घेणाऱ्यांचा सात बारा वर इ कर बोजा चढवणे या व्यतिरिक्तही कामे अडकलेली होती. वेंगुर्ला तहसीलदार कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तलाठी तात्काळ हजर राहावे याकरिता लक्ष वेधले होते.  आज गुरुवारी सकाळी ११ वाजता हे तलाठी हजर राहून आपला कार्यभार हाती घेतलेला आहे. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नाला यश आले असून तहसीलदार ओंकार ओतरी यांचे संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय यांनी आभार व्यक्त केले आहेत.