
कुडाळ : कुडाळ शहरातील केळबाईवाडी नजिक असलेल्या वाघसावंत टेंब येथील एका घराला गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत घराच्या माडीवरील खोलीसह तेथे राहणाऱ्या नाईक या भाडेकरू कुटुंबाचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने खोलीतील गॅस सिलिंडर वेळेत बाहेर काढण्यात यश आल्याने एक मोठा अनर्थ टळला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघसावंत टेंब येथील श्री भवानी मंदिरासमोर सामंत यांचे घर आहे. या घराच्या माडीवरील खोलीमध्ये नाईक कुटुंब भाड्याने राहते. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास या खोलीला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने खोलीतील कपडे, धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि सर्व जीवनावश्यक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत नाईक कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले असून ते पूर्णपणे उघड्यावर आले आहेत. तसेच या आगीची झळ लगतच्या दुसऱ्या खोलीलाही बसली.

आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ कुडाळ नगरपंचायत आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
आग लागली त्या खोलीत गॅस सिलिंडर होता. मात्र, स्थानिक नागरिक आणि मदतकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता तो सिलिंडर वेळेत सुरक्षितपणे बाहेर काढला. जर सिलिंडरचा स्फोट झाला असता, तर संपूर्ण परिसराला त्याचा मोठा फटका बसला असता. नागरिकांच्या या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी आणि अधिक नुकसान टळले. या घटनेची नोंद स्थानिक प्रशासनाकडे झाली असून, नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे












