तलाठी परीक्षा केंद्र जिल्ह्यात नाही | हे अपयश कोणाचे ? योगेश धुरी

Edited by: भरत केसरकर
Published on: August 12, 2023 20:29 PM
views 114  views

कुडाळ : हे सरकारच आमचं नाही हे सरकार गुजराथी लोकांचं भल करण्यासाठी आहे.तलाठी परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हयात परीक्षा केंद्रच  नाही.  हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंत्र्यांच यश म्हणावे की अपयश म्हणावे?असा सवाल युवासेना कुडाळ तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी उपस्थित केला आहे.

तलाठी भरती परीक्षेसाठी 900 आणि 1000 रुपये परीक्षा शुल्क भरून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याबाहेरच परीक्षा केंद्र देऊन विद्यार्थ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम राज्य शासन करत आहे. विद्यार्थ्यांनी आधीच  900 आणि 1000 रु परीक्षा शुल्क देऊन तलाठी भरतीचा अर्ज भरला. अर्ज भरतेवेळी पसंतीचे 3 परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय दिला होता. काहीजणांचा अपवाद वगळता साहजिकच प्रत्येकाने पहिल पसंतीच केंद्र म्हणून आपलाच  सिंधुदुर्ग जिल्हा निवडला होता. मात्र कालपासून परीक्षा केंद्र आणि परीक्षेची तारीख ऑनलाईन दाखवण्यात आली . यात विद्यार्थ्यांना कोल्हापूर हे परीक्षा केंद्र देण्यात आले.  याहून भयंकर म्हणजे ज्यांनी अर्ज करताना कोल्हापूर हे परीक्षा केंद्र निवडलेच नव्हते त्यांनाही कोल्हापूर देण्यात आले. परीक्षेच्या सकाळच्या सत्राची वेळ 9 वाजता आहे. त्यामुळे ज्यांची सकाळच्या सत्रात परीक्षा आहे त्यांना आदल्या दिवशी कोल्हापूर मध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही.  म्हणजेच आधी 1000 रुपये परीक्षा शुल्क घेऊन आता जिल्ह्याबाहेर परीक्षा केंद्र देऊन विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान करण्याचे काम राज्य सरकार आणि TCS करत आहे… एवढे परीक्षा शुल्क देऊनही जिल्हात परीक्षा केंद्राची सोय राज्य शासन करू शकत नसेल तर सर्व विद्यार्थ्यांची बाहेर जाण्या येण्याचा खर्च, राहणे- खाण्याची सोया सरकारने करावी अशी मागणी युवासेनेने केली आहे.

ज्या कंत्राटदाराने हे टेंडर घेतले त्याने विदयार्थ्यांचा जाण्या येण्याचा खर्च द्यावा किंवा सरकारने द्यावा. स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन संबंधित कंत्राटदारावर कारवाई व्हावी यासाठी  युवासेनेच्या वतीने उपरोधिक आंदोलन करण्याचा इशारा योगेश धुरी यांनी दिला आहे.