
सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचालित राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा ‘ताल द रीदम‘ ५ जानेवारी व ६ जानेवारी २०२४ या दोन दिवसात कॉलेजच्या सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून कोकण विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब उपस्थित राहणार आहेत. तसेच शि. प्र. मं. सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी आणि हितचिंतक यांचाही सक्रीय सहभाग असणार आहे.
प्रशालेमध्ये अभ्यासक्रमाबरोबर वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्या उपक्रमात अनेक विद्यार्थी सहभागी होऊन आपले कौशल्य व गुणवत्तेची चुणूक दाखवतात. त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. ५ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सकाळच्या सत्रात संमेलनाचे उद्घाटन, पारितोषिक समारंभ, रंगावली व हस्तकला प्रदर्शन आयोजित केले आहे. दुपारच्या सत्रात ३ नंतर शेलापागोटे कार्यक्रम आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात येतील.
६ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात फनी गेम्स आणि दुपारच्या सत्रात शेलापागोटे व विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडतील. या संमेलनात सर्व पालक आणि शिक्षणप्रेमी यांनी सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक संस्थाचालक तसेच प्राचार्य जगदीश धोंड, उपप्राचार्या डॉ. सुमेधा नाईक आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. माया नाईक आणि स्वरा शिरोडकर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.