
सावंतवाडी : कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांना शुल्लक कारणावरून शासनाचे नियम धाब्यावर बसवून अमानुषपणे वर्गात मारहाण केल्याच्या घटनेचा आंबेडकरी समाजाने तीव्र निषेध केला असून याबाबत कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
कलंबिस्त येथील हायस्कूलमध्ये मुलांची पटसंख्या कमी झाल्याने काही शिक्षकांना शासनाच्या नियमानुसार अन्यत्र जावे लागणार असल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी संस्थेने संबंधित शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांची संयुक्त बैठक शनिवारी आयोजित केली होती. मात्र ही बैठक सुरू होण्यापूर्वीच सदर आरोपींनी मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांना चर्चेसाठी म्हणून एका खोलीत बोलून घेतले व तेथेच संबंधित शिक्षकासह त्याच्या पत्नीने मारहाण केली. या घटनेनंतर संबंधित मुख्याध्यापकाने पोलीस स्टेशनला लेखी तक्रारही दिली आहे. त्यानुसार नऊपैकी आठ आरोपींना अटक केली असून एक आरोपी मात्र अद्यापही फरार आहे. सनदशीर मार्गाने हा विषय चर्चेने सोडवणे आवश्यक असताना संबंधितांनी कायदा हातात घेऊन ज्या पद्धतीने कृत्य केले, तो प्रकार निंदनीय व असंस्कृतपणाचा असल्याने या घटनेचा तीव्र निषेध सर्व समाजामध्ये केला जात आहे.
या घटनेबाबत एक लेखी निवेदनही आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी व पोलीस निरीक्षक यांना दिले असून लवकरच या विषयावर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे स्थानिक कार्यकर्ते संजय पालकर यांनी स्पष्ट केले आहे. या निवेदनावर संजय पालकर यांच्यासह रवी जाधव, पत्रकार मोहन जाधव, यशवंत डिग्रीकर, दत्ताराम कदम, वाणू कदम, भावना कदम, मानसी सांगेलकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सह्या आहेत.