गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करा

कणकवली मुख्याधिकाऱ्यांच्या पोलिसांना सूचना
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 07, 2025 20:17 PM
views 32  views

कणकवली : गणेशोत्सव काळात शहरात वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात. शहरात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता महावितरणने घ्यावी, उड्डाणपुलाखाली विक्रेत्यांना सर्व्हिस रोडवर बसू देऊ नका, अशा सूचना सूचना मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात नियोजन करण्यासाठी पोलीस, महावितरण, नगरपंचायतीच्या अधिकाºयांसमवेत मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी न. पं. पंचायतीमध्ये गुरूवारी सकाळी बैठक घेतली. यावेळी न. पं. प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन कांबळे, वाहतूक पोलीस दिलीप पाटील, पोलीस हवालदार पांडुरंग कळंत्रे यांच्यासह महावितरण व न. पं. चे अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने चाकरमानी व नागरिक कणकवली शहरात वाहने घेऊन येतात. वाहनांमुळे कणकवली-आचरा मार्गासह शहरातील अन्य भागांत वाहतूक कोंडी होते. यंदाही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी उपाययोजना कराव्यात. कणकवली-आचरा मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी किनई मार्गे वाहने वळवीत, सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता डी.पी. रोडवर दुचाकी पार्किंची व्यवस्था करावी, उड्डाणपुलाखाली चारचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था करावी, गणेशोत्सव काळात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करावी. सर्व्हिस रोडलगत नो पार्किंचे बोर्ड लावावेत, किनई रोड येथे एकदिशा मार्गचा बोर्ड लावावा, बाजारपेठेत अवजड वाहनांवर प्रवेश बंदी करावी, यासह अन्य सूचनाही पाटील यांनी पोलिसांना केल्या. महावितरणने शहरात वीज विषयक कामे सुरू केली आहे. ही कामे पूर्ण करताना गणेशोत्सव काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी. उड्डाणपुलाखाली विक्रेते सर्व्हिसरोडवर बसणार नाही, यासाठी सर्व्हिस रोडपासून तीन फूट विक्रे त्यांनी बसावे, याकरिता न. पं. च्या कर्मचाºयांनी रेषा निश्चित करून त्यांना बसण्याची सूचना करावी, असे पाटील यांनी सांगितले.