अनधिकृत डॉक्टरांवर तातडीने कारवाई करा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 28, 2025 18:13 PM
views 408  views

देवगड : देवगड तालुक्यात बनावट व अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांचा सुळसुळाट सुरू असून चुकीच्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. यावर तातडीने निर्बंध घालण्यासाठी तालुक्यातील बनावट व अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब, देवगड शाखेने केली आहे. पोलिस निरीक्षक तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना तसे निवेदनही दिले.

या निवेदनात म्हटले आहे, देवगड डॉक्टर्स फॅटर्निटी क्लबची देवगड पोलिसांकडे मागणी केलीय. तालुक्यात बनावट व अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या वाढत आहे. कोणतीही शासनमान्य अधिकृत वैद्यकीय पदवी नसताना चुकीच्या पद्धतीने गैरउपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळ करत आहेत. ही गंभीर बाब आहे. संबंधित अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांची आपल्या खात्यामार्फत सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,असा इशारा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिला आहे.

डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब देवगडचे अध्यक्ष डॉ. सतीश लिंगायत, डॉ. स्वप्नील शिंगाडे, डॉ. अजित ठुकरूल, डॉ. विलास पाळेकर, डॉ. प्रदीप पोतदार, डॉ. हर्षद गुरव, डॉ. मुकुल प्रभुदेसाई, डॉ. प्रथमेश वळंजू, डॉ. किरण हिंदळेकर, डॉ. आदित्य शिंदे, डॉ. धनंजय भिडे, डॉ. सुजित कदम आदी उपस्थित होते. निवेदनाची प्रत देवगड-जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी, तहसीलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी, देवगड पोलिस निरीक्षक यांना दिली आहे.