पिंगुळी ग्रामपंचायतीचा गुरुनाथ सडवेलकर यांच्यावर पलटवार

गावाची दिशाभूल न करण्याचे आवाहन सरपंच अजय आकेरकर यांचे आवाहन
Edited by:
Published on: April 30, 2026 20:03 PM
views 75  views

पिंगुळी (कुडाळ): कुडाळ तालुक्यातील पिंगुळी ग्रामपंचायतीचे सदस्य गुरुनाथ सडवेलकर यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेतील दावे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहेत. पाझर तलावात कोणतेही प्रदूषण नसून, सडवेलकर हे अपूर्ण माहितीच्या आधारे गावाची आणि जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच सडवेलकर आज १ मे रोजी करत असलेले उपोषण हे जनतेसाठी की स्वतःच्या स्वार्थासाठी आहे असा खोचक सवाल पिंगुळी सरपंच अजय आकेरकर यांनी केला आहे. 

यावेळी जि प सदस्य सडवेलकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सरपंच आकेरकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी सदस्य शशांक पिंगुळकर, माजी उपसरपंच सागर रणसिंग, सदस्य केशव पिंगूळकर, सोनाक्षी गावडे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सरपंच आकेरकर म्हणाले की, सडवेलकर यांनी कालची पत्रकार परिषद घेतली त्यातून असे दिसून येते की, त्यांचा अभ्यास अपूर्ण आहे. यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाझर तलावा संदर्भात मी पूर्ण खुलासा केला होता. त्यांना जे कोणी माहिती देत आहेत त्या अपूर्ण माहितीच्या आधारे  सडवेलकर बोलत आहेत. उपोषणाला मी जाण्याचा विषय ते म्हणत असतील तर योग्य आहे. मात्र हे उपोषण ते का करत आहेत? त्यांचा यामागे काय हेतू आहे? याबाबत शंका उपस्थित होते.

 त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी त्यांच्यासोबत असलेले व्यक्ती यांनी यापूर्वी सुद्धा अनेक उपोषण करून किंवा अन्य मार्गाने आर्थिक हित साधण्याचे काम केले आहे. त्यामध्ये त्यांचा पूर्णतः स्वार्थ दिसून आलेला आहे.  पाझर तलावाची पाहणी केल्यानंतर अद्याप पर्यंत त्या ठिकाणी सांडपाणी सोडण्याचा किंवा तलावाला धोका निर्माण होईल अशी कृत्य केल्याचे आढळून आलेले नाही. त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतीने परवानगी गृह प्रकल्पाला दिली आहे की बिनशेती करण्यासाठी दिली आहे याचाच अभ्यास त्यांनी केलेला दिसत नाही.

एखादा दाखला देताना त्याला सूचक अनुमदक नसतो जो आपण मासिक मीटिंगमध्ये ठराव घेतो त्याला सूचक व अनुमोदक दिलेला असतो, याचा त्यांनी अगोदर अभ्यास करावा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अहवाला बाबत सडवेलकर यांनी वक्तव्य केला आहे मात्र तो अहवाल त्यांनी पूर्णपणे वाचला नसल्याचे समजते कर्मचाऱ्यांनी जो अहवाल दिला आहे त्यामध्ये तोंडी आदेश किंवा मासिक मीटिंगमध्ये आदेश दिल्यानंतर आमचे कर्मचारी त्या ठिकाणी गेले आहे त्यामुळे तलावाचे पाणी दूषित होणार किंवा त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी माजी व पूर्णपणे कार्यकारणीचे आहे त्यानुसार कर्मचाऱ्यांत अहवाल केला आहे त्यामुळे सडवेलकर यांनी जनतेची दिशाभूल करून उलट सुलट पसरवू नये त्यामुळे त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की, विकासाला विकासात्मक दृष्टीनेच बघावं पिंगळीची जनता ही सुज्ञ आहे. गावाचा विकास कोणत्या दिशेने चालू आहे तो पण जनतेला माहित आहे आणि पूर्ण गाव आमच्या पाठीशी आहे हे काहीजण दिशाभूल करतायेत ती त्यांनी थांबवावी हीच सडवेलकर यांना कळकळीची विनंती आहे. आणि आपण सदस्य पदी विराजमान झालात त्याचा गावाच्या विकासासाठी वापर करावा असे आवाहन सरपंच अजय आकेरकर यांनी केले आहे. 

ग्रामपंचायतीमार्फत आम्ही त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे प्रदूषण किंवा सांडपाणी सोडल्याचे आढळून आलेले नाही. मात्र त्यांच्या सांगण्यानुसार भविष्यात जर असा प्रकार आढळून आल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास आम्ही पाठी येणार नाही. आणि त्यासाठी आम्हाला उपोषणासारखा मार्ग अवलंबण्याची कोणती गरज नाही. नगररचनाकारांनी (Town Planner) मंजूर केलेल्या आराखड्यानुसार तिथे ३ एसटीपी (STP) प्लांट प्रस्तावित असून, विकासकाने ते कार्यान्वित करण्याची हमी दिली आहे. त्यामुळे सडवेलकर यांनी गावाची बदनामी करण्याऐवजी व उपोषणाच्या मार्गाने दिशाभूल करण्या ऐवजी आमच्या सोबत बसून चर्चा करून गावाच्या विकासाला चालना द्यावी असे आवाहन सदस्य शशांक पिंगुळकर यांनी केले. 

तलावामध्ये बोटिंग करण्यासंदर्भात पिंगुळी ग्रामपंचायतला कोणताही अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतचा त्यांना परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सदस्य सडवेलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील लोकांची दिशाभूल करणे थांबवावे असे आवाहन माजी उपसरपंच रणसिंग यांनी केले.