फक्त रेफर सेंटर नको, रुग्णसेवा द्या

उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेबाबत संदेश पारकर यांनी बजावले
Edited by:
Published on: April 30, 2026 20:10 PM
views 41  views

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी गुरुवारी सायंकाळी उपजिल्हा रुग्णालय गाठले. तेथे उपस्थित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. सुबोध इंगळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांच्यावर पारकर यांनी विविध प्रश्नांचा भडीमार केला. उपजिल्हा रुग्णालय हे केवळ 'रेफर सेंटर' असता कामा नये. येथे रुग्णांना योग्य सेवा मिळायला हवी, असेही पारकर यांनी बजावले. यावेळी डॉ. श्रीपाद पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयातील समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील, अशी ग्वाही पारकर यांना दिली.

रुग्णालयात तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने प्रसूती आणि महिलांच्या आजारांसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. येथे त्वरित कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ज्ञाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी पारकर यांनी केली. तर राज्यात डॉक्टरांची १४४० पदे भरण्यात येणार असून यामध्ये विशेषतः नक्षली व ग्रामीण भागातील रुग्णालयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे ही पदे लवकरच भरली जातील, असे डॉ श्रीपाद पाटील म्हणाले. रुग्णालयातील सुसज्ज आय.सी.यू. कक्ष केवळ निधीअभावी बंद आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी हा कक्ष तातडीने सुरू करण्यात यावा, असेही पारकर म्हणाले. आय.सी. यू. आठवडाभरात सुरू होईल, असे आश्वासन डॉ. पंकज पाटील यांनी दिले. लहान मुलांच्या उपचारांसाठी कायमस्वरूपी बालरोगतज्ज्ञ आणि शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या भूलतज्ज्ञ डॉक्टरांची पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी देखील पारकर यांनी केली. 

हृदयविकाराच्या निदानासाठी आवश्यक असणारी टू-डी इको सेवा उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड देखील सहन करावा लागत आहे, याकडेही पारकर यांनी लक्ष वेधले. रुग्णालयात शस्त्रक्रियांची संख्या वाढत आहे, मात्र त्या प्रमाणात कामाचा ताण पेलण्यासाठी पुरेसे कर्मचारी आहेत का? असा सवाल पारकर यांनी केला. मात्र रुग्णालयात आवश्यक तेवढ्या परिचारिका उपलब्ध असल्याचे डॉ पंकज पाटील यांनी सांगितले. 

रुग्णालय परिसरातील अंतर्गत रस्त्यांची आणि ड्रेनेज गटारांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची व गटारांची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचेही पारकर म्हणाले. ड्रेनेजचे काम सदर ठेकेदाराने योग्य पद्धतीने केले नसल्याचे डॉ. पंकज पाटील म्हणाले. यावर, लवकरच बांधता विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेईन, असे आश्वासन पारकर यांनी दिले. कचरा बंदोबस्ताबाबत नगरपंचायत सहकार्य करील असेही पारकर यांनी सांगितले. रुग्णालयातील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत बिकट असून तिथे दुर्गंधी पसरली आहे. रुग्णांच्या आरोग्याचा विचार करून स्वच्छतागृहांची तात्काळ दुरुस्ती व नियमित स्वच्छता राखण्यात यावी, असेही पारकर म्हणाले.

कणकवलीच्या १०८ रुग्णवाहिकेवर बी.एम.एस. डॉक्टर उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. एक ते दोन तास इतर तालुक्याच्या रुग्णवाहिकेची वाट पहावी लागते, याकडे देखील पारकर यांनी लक्ष वेधले. डॉ पंकज पाटील यांनीही गेल्या चार महिन्यांपासून १०८ रुग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कबूल केले. मात्र रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवत असताना आम्ही उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर १०८ रुग्णवाहिकेसोबत पाठवतो, असेही पंकज पाटील म्हणाले. मात्र १०८ रुग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध नसल्याबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन श्रीपाद पाटील यांनी दिले. 

रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यासाठी वॉटर कुलरची व्यवस्था करण्यात यावी. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सलग दोन वेळा डॉक्टर वर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात नोंदीही आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, असेही पारकर म्हणाले.