गोड बातमी | दिवाळीच्या शुभारंभालाच आडाळी MIDCत भूखंडाचे वाटप

Edited by: संदीप देसाई
Published on: November 10, 2023 17:17 PM
views 613  views

दोडामार्ग : गेली अनेक वर्षे प्रतीक्षा लागून राहिलेल्या  आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड एन दिवाळी सणाच्या शुभरंभाला उद्योजकांच्या ताब्यात देण्याला शुक्रवार पासून सुरवात करण्यात आली आहे. चार उद्योजकांना शुक्रवारी भूखंडांचा ताबा देण्यात आला. नीच्छीतच ही शुभवार्ता असून आडाळीत आता उद्योग उभारणीचे मार्ग उद्योजकांसाठी खुले झाले आहेत.

औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पाठपुरावा करणाऱ्या आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास समिती व 'घुंगुरकाठी 'अंतर्गत स्थानिय लोकांधिकार संरक्षण समिती च्या वतीने सर्व उद्योजकांचे यावेळी स्वागत करण्यात आले.

आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड डिसेंबर 22 मध्ये खुले करण्यात आले होते. त्यानंतर भूखंड वितरण प्रक्रिया बराच काळ रखडली. 20 ऑगस्टला कृती समितीने आडाळी ते बांदा असा लॉंग मार्च काढला. त्यावेळी महामंडळाने भूखंड वाटप प्रक्रियेला गती दिली. आज अखेर प्रत्यक्ष भूखंड ताब्यात देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली. महामंडळच्या अधिकारी दर्शना एकावडे यांनी आज चार भूखंड उद्योजकांच्या ताब्यात दिले. यावेळी कृती समितीच्या वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. समितीचे अध्यक्ष पराग गांवकर, सल्लागार सतीश लळीत, सचिव प्रवीण गांवकर, सदस्य प्रसाद मनोहर गांवकर, मधुकर महादेव गांवकर यांच्याहस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी समितीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

आडाळीसाठी ऐतिहासिक क्षण..!

यावेळी बोलताना सरपंच तथा कृती समिती अध्यक्ष पराग गांवकर यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले 2013 मध्ये या औद्योगिक क्षेत्राला मंजुरी मिळाली होती. स्थानिकांच्या सकारात्मक सहकार्यामुळे महामंडळाकडे जमीन हस्तानतरीत झाली. मात्र बदललेल्या सत्तेच्या राजकीय समीकरणामुळे राजकीय साठमारीत प्रकल्पाचा विकास अडकला. कृती समिती व लोकांधिकार संरक्षण समितीने सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आज भूखंड प्रत्यक्ष ताब्यात दिले गेले. आजचा ऐतिहासिक क्षण आडाळी वासियांसाठी गौरवास्पद आहॆ. औद्योगिक विकासाला अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा आहॆ. या कामासाठी राजकीय पुढारी व महामंडळच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले, त्याबद्दल आभार व्यक्त केले.