केसरकरांकडून पर्यटन रोजगाराचे 'गोड गुलाबजाम' ; ठाकरे सैनिकांचा आरोप

केसरकरांच्या घरात बसून प्रेस घेण्याची भाजपवर दुर्देवी वेळ : रुपेश राऊळ
Edited by: विनायक गांवस
Published on: April 12, 2024 12:59 PM
views 153  views

सावंतवाडी : अर्ज भरायला सुरुवात झाली तरी महायुतीचा उमेदवार ठरत नाही. मात्र, केसरकर न ठरलेल्या उमेदवाराला एका लाखाच मताधिक्य देण्याची वल्गना करत आहेत. भाजपवर तर केसरकरांच्या घरात बसून पत्रकार परिषद घेण्याची दुर्देवी वेळ आली आहे. दीपक केसरकर यांनी केवळ पर्यटन रोजगाराचे 'गोड गुलाबजाम' जनतेला दाखवले. प्रत्यक्षात काही केलं नाही अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तालुकाप्रमुखांनी केली.

सावंतवाडीचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ म्हणाले, अर्ज भरायला सुरुवात झाली तरी महायुतीचा उमेदवार अद्याप ठरत नाही. तर दुसरीकडे शिंदेंचे राष्ट्रीय प्रवक्ते दीपक केसरकर न ठरलेल्या उमेदवाराला एक लाखांच मताधिक्य मिळेल असं  सांगत आहेत. त्यामुळे केसरकरांनी आधी उमेदवार जाहीर करावा नंतर मताधिक्याची वल्गना कराव्यात असा टोला श्री. राऊळ यांनी लगावला. तर रोजगार, आरोग्य, कबुलायतदार आदी प्रश्न तसेच आहेत. केवळ निवडूकीच्यावेळी हे लोक एक येतात. दीपक केसरकर व राजन तेली स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येतात अशी टीका केली. तर शिवसेनेचे कधीही नसणारे खोटे पक्षप्रवेश शिंदे गटात दाखवले जात आहेत. भाजपवर तर केसरकरांच्या कार्यालयात बसून पत्रकार परिषद घेण्याची दुर्देवी वेळ आली आहे‌. उमेदवार जाहीर करू न शकणारे मताधिक्य मिळणार असं सांगत आहेत. कदाचित खासदार विनायक राऊत बिनविरोधच निवडून येतील. भाजप व केसरकर विकास करू न शकल्याने महायुतीचा पराभव निश्चित आहे असं मत रूपेश राऊळ यांनी व्यक्त केल.

दरम्यान, दीपक केसरकर सातत्याने दहशतवादाचा डंका पिटवत होते. आज त्यांच्याच पंखाखाली जाऊन बसायची वेळ केसरकरांवर आली आहे. अन्यथा, मतदारसंघात उमेदवारी मिळणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळेच नारायण राणेंच नाव त्यांनी लोकसभेला लावून धरल आहे. त्यांनी केवळ पर्यटन रोजगाराचे गोड गुलाबजाम जनतेला दाखविले असून प्रत्यक्षा काही करू शकले नाही असं मत वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी व्यक्त केले. दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस म्हणाले, दोडामार्ग आडाळी एमआयडीसीत केसरकर काही करू शकले नाही. एकही उद्योग दहा वर्षांत आणला नाही. आमदार म्हणून ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून विनायक राऊत यांना भरघोस मताधिक्य मिळेल. केसरकरांची एक लाखाची वल्गना केवळ वल्गना राहील. याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब व दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, उप जिल्हा संघटक शब्बीर मणियार आदी उपस्थित होते.