
वेंगुर्ला : महाराष्ट्रातील सर्वात जुन्या नगरपरिषदांपैकी एक असा लौकिक असलेल्या तसेच संपूर्ण देशात स्वच्छतेत नावलौकिक मिळवलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्थापनेस २५ मे २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण होत आहेत. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणा-या वेंगुर्ला नगरपरिषदेने वर्षानुवर्षे शहराच्या विकासासोबत स्वच्छतेतून समृध्दीकडे सातत्याने वाटचाल केलेली आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत दिनांक २५ मे २०२५ रोजी “स्वच्छ वेंगुर्ला दौड” आयोजित करण्यात आलेली आहे.
“स्वच्छ वेंगुर्ला दौड” या उपक्रमा अंतर्गत १५ कि.मी. खुली मॅरेथॉन स्पर्धा (पुरुष + महिला) व ५ कि.मी. खुली हौशी (फन रन) मॅरेथॉन स्पर्धा (पुरुष + महिला ) घेण्यात येणार आहेत. १५ कि.मी. खुली मॅरेथॉन स्पर्धा घोडेबाव गार्डन कडून सुरू होणार असून पुढे अग्निशमन केंद्र, मल्टीपर्पज हॉल, तहसिल कार्यालय, फळ संशोधन केंद्र, रामघाट रोड, स्वच्छ भारत पर्यटन स्थळ, पावर हाऊस मार्गे रामेश्वर मंदिर, पिराचा दर्गा, वेंगुर्ला बस स्थानक, मानसीश्वर उद्यान मार्गे नवाबाग, झुलता पुल, वेंगुर्ला बंदर, दाभोली नाका, वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय व मार्केट, हॉस्पिटल नाका, त्रिवेणी उद्यान, घोडेबाव उद्यान असा मार्ग असणार आहे.
ही स्पर्धा सकाळी ठीक ६.०० वाजता सुरु होईल. या स्पर्धेची नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने होणार आहे. नोंदणीसाठीची अंतिम तारीख दिनांक १७ मे राहील. या नोंदणीसाठी शुल्क रक्कम रु.३००/- राहील. त्यांनतर २० मे पर्यंत ऑफलाईन पध्दतीने नोंदणी करणा-या स्पर्धकांना ४००/- रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. २० मे नंतर कोणत्याही प्रकारे नोंदणी स्वीकारली जाणार नाही. या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणा-यांना टी-शर्ट तसेच स्पर्धा पूर्ण करणा-यांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. पहिल्या तीन विजेत्यांना ( 3 पुरुष आणि 3 महिला ) ट्राफीसह अनुक्रमे रोख रक्कम रु. ५,०००/-, ३,०००/- व २,०००/- या प्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे.
५ कि.मी. खुली हौशी मॅरेथॉन (FUN RUN) स्पर्धा घोडेबाव गार्डन कडून सुरु होणार असून पावर हाऊस मार्गे रामेश्वर मंदिर, पिराचा दर्गा, दाभोली नाका, वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय व मार्केट, हॉस्पिटल नाका, त्रिवेणी उद्यान, घोडेबाव उद्यान असा मार्ग असणार आहे. ही स्पर्धा सकाळी ठीक ७.०० वाजता सुरु होईल. स्पर्धेची नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने होणार आहे. सदरच्या नोंदणीसाठीची अंतिम तारीख दिनांक २० मे राहील. या नोंदणीसाठी शुल्क रक्कम रु.५०/- राहील. त्यांनतर २२ मे २०२५ पर्यंत ऑफलाईन पध्दतीने नोंदणी करणा-या स्पर्धकांना १००/- रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. २२ मे नंतर कोणत्याही प्रकारे नोंदणी स्वीकारली जाणार नाही.सदरच्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणा-यांना टोपी व प्रमाणापत्र देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेच्या बाबतीत अधिक माहितीसाठी नगरपरिषदेचे कर्मचारी गणेश कांबळे, (९६६५८५६५३०) व श्री स्वप्नील कोरगावकर (८८८८४३००८९ ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी केले आहे.