शाश्वत कोकणची ज्योत हृदयात तेवत ठेऊ : कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे

सावंतवाडीत शाश्वत कोकण परिषद ; युवकांचा सहभाग
Edited by: जुईली पांगम
Published on: April 29, 2024 04:39 AM
views 365  views

सावंतवाडी : कोकण हे जगातील आजच्या घडीचं जगण्यासाठी बेस्ट प्लेस आहे. आजी आजोबांचे कोकण आपल्याला ठेवायचं नाही. शेवटची पिढी म्हणून सहानुभूती घेऊन कोकण वाचवायचं नाही. जे तरुण आपण आहोत तीच नवी पिढी आहोत. शेवटच्या पिढीतील जीवनशैली आपल्याला स्वतःत उतरविली तरच शाश्वततेकडे जाऊ शकतो. या चळवळीला तुमची साथ हवी. ही ज्योत प्रत्येकाच्या हृदयात नेहमी तेवत ठेऊयात आणि शाश्वत कोकण ठेवण्यासाठी सगळेजण एक होऊयात असं भावनिक आवाहन कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांनी शाश्वत कोकण परिषदेत केलं. 

पुढे ते म्हणाले, चुकीच्या पद्धतीने होत असलेला विकास डोक्यात ठेवून काम करायला पाहिजे. आपण वेडे बनता नये, स्वार्थी बनता नये. माझं मी शाश्वत जीवन जगतो या मानसिकतेत राहता नये. तुमच्या एक एकर जमिनीच्या बाहेर जे कोकण आहे ते उद्ध्वस्त होत असताना तुम्ही इथे शाश्वत जीवनशैली जगू शकत नाही. संपूर्ण परिसंस्था वाचायला हवी आणि कोकणची देवराई म्हणून जपायला पाहिजे.

आपल्या जीवनशैलीतूनच आपल्याला कोकण वाचवायचे. त्याचबरोबरीने कोकणामध्ये येणारे जे विनाशकारी प्रकल्प असतील ते थांबवण्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. म्हणूनच कोकणची लोक संस्कृती, जीवनशैली बाबत जनजागृती करणारे कार्यक्रम भविष्यात या माध्यमातून राबवले जातील. 

शाश्वत कोकण परिषदेची सभा सावंतवाडीतल्या आरपीडी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात झाली. ‘संघर्षाकडून समृद्धीकडे’ या तत्त्वावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. यावेळी पर्यावरण वादी कार्यकर्ते शशी सोनवणे, सत्यजीत चव्हाण, मंगेश चव्हाण, श्री हसन, मल्हार इंदुलकर यांनी मार्गदर्शन केलं. 

विनाशकारी प्रकल्पाविरोधात रस्त्यावरची लढाई लढावी लागेल : शशी सोनवणे 

काय नाकारायचे, काय स्वीकारायचे आणि काय जतन करायचे या तिन्ही गोष्टी एकाच वेळी महत्त्वाच्या आहेत, त्या राबविण्याची प्रकिया म्हणजे शाश्वत कोकण परिषद असं मला वाटतं. ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट क्रायसिस हे मानवनिर्मित आहेत, त्यापेक्षा भांडवली व्यवस्थेने दिलेले आहेत. हे ज्यांना समजतंय ते जाणीवपूर्वक नाकारतायत. त्या लढ्याचा आपण सर्वजण भाग आहोत. हा झाला नाकारण्याचा भाग. कोकणातले सर्वच जिल्हे घ्या, यात पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत अख्खा पट्टा मुंबईसह पकडला तर सागरी, डोंगरी आणि नागरी असे क्षेत्र. यामध्ये आपण सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहोत, हे आपल्याला जेवढे जाणवतं तेवढं पॉलिसी मेकर्सना जाणवत नाही. किंबहुना त्यांच्या दृष्टीने हे सर्व रिसोर्सेस आहेत. त्यांनी माणसाचा सुद्धा रिसोर्स करून टाकलाय. त्याला तुम्ही हद्दपार केलंच पाहिजे. ‘विकासाची दृष्टी उफराटी’ हे आपण मान्य केलं पाहिजे. गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत ‘विकास वेडा झाला’ अशी घोषणा देण्यात आली होती त्याप्रमाणे आता खरोखरच विकास वेडा झालाय हे आपण स्वीकारलं पाहिजे. हा वेडेपणा मान्य केला तर त्यावर उपाय करून त्याला मार्गावर आणता येते. मात्र माझी लाईन बरोबरच आहे मी सरळमार्गी असं म्हटलं तर त्याचे उत्तर शोधता येत नाही. आतापर्यंत राबवण्यात आलेली विकासाची धोरणं ती सर्वच्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारी आहेत. स्थानिक निसर्गाला उद्ध्वस्त करणारी आहेत. मुंबई गोवा हायवे झाला, चिंता वाढली. कोकण रेल्वे आली, चिंता वाढली.  गैरसोय परवडली पण ही सोय नको असं म्हणायची पाळी आली. अशावेळी व्यापक दृष्टिकोन ठेवून समृद्धीचा विचार करावा लागेल. आपल्याकडे बरंच काही आहे पण आपल्याला ते समजलं नाही, ही आपली समस्या आहे. आंदोलनातून आपण आतापर्यंत खूप गाऱ्हाणी मांडली. आता गाऱ्हाणं नको. विनाशकारी प्रकल्प येऊच देणार नाही. आमच्या भागात बनूच देणार नाही या भूमिकेत आपल्याला राहावं लागेल. आमच्या विकासाच्या वाटा आम्ही चालू आणि जेव्हा लोक मिळून हे ठरवतात तेव्हा सर्वांगीण गोष्टी घडून येतात त्याचा दबाव पॉलिसी मेकर्सवर पडतो. पॉलिसी मेकर्स हे आपल्यातलेच असले पाहिजेत. नियोजन ठरवणारे, धोरण ठरवणारे हे हात आपल्यातलेच असले पाहिजेत असा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. आता कुठल्याही ट्रॅपमध्ये अडकायचं नाही. जो जो विनाशकारी प्रकल्प, विनाशनीती, या निसर्गाची हानी करणारे आपल्यावर लादले जातील. त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावरची लढाई लढावीच लागेल. कायद्याची लढाई कायदेशीरपणे लढावीच लागेल याला पर्याय नाही आणि लढत असताना मग जे मुळात आमचं आहेच त्याचं जतन, संवर्धन आणि विकास हे समांतरपणे आपल्याला करावे लागेल. त्यामुळे झेंडा घेऊन आंदोलन करणारा कार्यकर्ता ही हवा आणि शांतपणे अदृश्य राहून काम करणारे मोठा समूहही जोडीला हवा. आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे युरोपीय देशांनी स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग बंद करून टाकलं. ते विनाशकारी प्रकल्प चीन आणि भारतासारख्या देशांमध्ये लादलेत. त्यामुळे आता आपल्याला मेक इन इंडिया, मेक फॉर इंडिया  हे पर्याय आपल्याला उभे करावे लागतील. त्याच्यासाठीचा हा आपला कोकणचा परिसर त्याचं एक व्हिजन आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये बनवायचं आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणजे शाश्वत कोकण परिषद आहे. पण याच बरोबरीने आम्हाला आमचा विकास, आमची दृष्टी, आमचा निसर्ग कसा टिकवायचा आहे, हे आम्ही आमच्या मेहनतीने, आमच्या पद्धतीने विचार करून त्याचा एक आराखडा आम्ही बनवू, असं परखड मत पर्यावरणवादी कार्यकर्ते शशी सोनवणे यांनी व्यक्त केलं. 

संघर्ष करण्याची तयारी : सत्यजीत चव्हाण 

कोकणवर प्रेम करणारा माणूस आणि त्याची अस्मिता निर्माण करणे हे शाश्वत कोकण परिषदेचं उद्दिष्ट आहे. कोकणला काय नको, काय हवं याची स्पष्ट कल्पना हवी. जैतापूर, रिफायनरी, विनाशकारी प्रकल्प नको. तर समृद्धी कशी पाहिजे याचा विचार या माध्यमातून करतोय. कोकणी माणूस प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतोय यापेक्षा आपल्याला कोणते प्रकल्प हवेत ही भूमिका असली पाहिजे. निसर्ग वाचवायचाय, कोकणसाठी वेगळे धोरण पाहिजे पण काँक्रिटीकरण, रस्ते असला विकास नको. निसर्ग राखायला हवा. त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी हवी. या मुद्द्यांची स्पष्टपणे मांडणी करून राजकारण्यांच्या गळी उतरवण्यासाठी दबाव टाकायची गरज आहे, असं अभ्यासपूर्ण भूमिका पर्यावरणवादी कार्यकर्ते सत्यजीत चव्हाण यांनी मांडली. 

सूत्रसंचालन ऋषिकेश पाटील यांनी केलं. या शाश्वत परिषदेसाठी जिल्हाभरातील युवकांचा सहभाग पाहायला मिळाला.